बारामती : प्रतिनिधी
बारामती कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदी सुनिल वसंतराव पवार यांची, तर उपसभापतीपदी निलेश भगवान लडकत यांची बिनविरोध निवड करण्यात आली. विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या सुचनेनुसार ही निवड करण्यात आली.
बारामती कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती व उपसभापती निवडीबाबत आज बैठक पार पडली. विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या सुचनेनुसार राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष संभाजी होळकर यांनी संचालक मंडळाच्या बैठकीत सभापतीपदासाठी सुनिल पवार आणि उपसभापतीपदासाठी निलेश लडकत यांचे नाव जाहिर केले.
निवडणुक निर्णय अधिकारी तथा सहाय्यक निंबधक मिलींद टांकसाळे यांच्याकडे या दोन्ही पदांसाठी दोनच अर्ज दाखल झाल्यामुळे बिनविरोध निवड करण्यात आली. यावेळी दूध संघाचे अध्यक्ष संदिप जगताप, खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष दत्तात्रय आवाळे, धनवान वदक, लक्ष्मण मोरे, नारायण कोळेकर, तुषार कोकरे, सुनिल बनसोडे, दिलीप परकाळे, विलास कदम, संभाजी किर्वे, सुर्यकांत गादिया आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.