बारामती : प्रतिनिधी
दिवाळी खरेदीसाठी आलेल्या एका महिलेची हरवलेली बॅग परत देत बारामतीतील एका दांपत्याने प्रामाणिकपणा दाखवून दिला. त्यामुळे सणासुदीच्या काळात तणावग्रस्त ठरलेल्या महिला आणि त्यांच्या कुटुंबीयांना दिलासा मिळाला आहे. बारामती शहर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक सुनील महाडीक, वडगावचे सहाय्यक पोलिस निरीक्षक सोमनाथ लांडे यांनी या दांपत्याचे कौतुक करत त्यांचा सत्कार केला.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, शनिवारी बारामती तालुक्यातील चिरेखाणवाडी येथील रहिवासी माधुरी किसन जगदाळे या कोऱ्हाळे येथे कपडे खरेदीसाठी गेल्या होत्या. कपडे खरेदी करून किराणा माल घेऊन त्या वडगाव निंबाळकरकडे गेल्या. या दरम्यान, आपली बॅग प्रवासादरम्यान हरवली असल्याचे त्यांच्या लक्षात आले. ऐन सणाच्या दिवसांत दागिने आणि रोख रक्कम असलेली बॅग हरवल्याने त्या हतबल झाल्या.
दरम्यानच्या काळात, बारामती शहरात वास्तव्यास असलेले विठ्ठल सुरेश शिंदे आणि प्रियंका विठ्ठल शिंदे हे दांपत्य आपल्या मुलांसह बारामतीकडे येत होते. त्यावेळी त्यांना चोपडजजवळील पांढरेवस्ती येथे ही बॅग आढळून आली. ते बारामती कडे येत असल्यामुळे त्यांनी ही बॅग बारामती शहर पोलिस ठाण्यात पोलिस निरीक्षक सुनील महाडीक यांच्याकडे सुपूर्द केली.
या बॅगमध्ये मंगळसूत्र, नेकलेस, सोन्याची कर्णफुले, दोन मोबाईल आणि रोख रक्कम असा एकूण १ लाख ४० हजार ३५० रुपयांच्या वस्तू होत्या. वडगाव निंबाळकर पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक सोमनाथ लांडे यांच्यामार्फत त्या मूळ मालक असलेल्या माधुरी जगदाळे यांना परत करण्यात आल्या.