Site icon Aapli Baramati News

विद्या प्रतिष्ठान कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयाला सर्वोत्कृष्ट महाविद्यालय पुरस्कार प्रदान

ह्याचा प्रसार करा

बारामती : प्रतिनिधी

विद्या प्रतिष्ठानच्या कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयाला सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या वतीने २०२२-२०२३ या वर्षासाठी सर्वोत्कृष्ट महाविद्यालय पुरस्कार देऊन गौरवण्यात आले आहे. पुणे विद्यापीठाच्या वर्धापनदिनी पार पडलेल्या कार्यक्रमात हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

सावित्रीबाई फुले पुणे विदयापीठाच्या वर्धापनदिनानिमित्त गुणवत्ता सुधार योजनेंतर्गत हा पुरस्कार जाहीर करण्यात आला होता. या पुरस्कारासाठी बारामतीतून विद्या प्रतिष्ठानच्या कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयाने प्रस्ताव पाठवला होता. विद्यापीठ समितीने महाविद्यालयाची पाहणी केल्यानंतर ग्रामीण विभागातील सर्वोत्कृष्ट महाविद्यालय म्हणून विद्या प्रतिष्ठानच्या कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयाचा गौरव केला आहे. विद्या प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष ए.व्ही. प्रभुणे, विश्वस्त सुनेत्रा पवार, डॉ. राजीव शहा, रजिस्ट्रार श्रीश कंभोज यांच्यासह प्राचार्य डॉ. भरत शिंदे आणि सहकाऱ्यांनी हा पुरस्कार स्वीकारला. तीन लाख रुपये रोख, स्मृतीचिन्ह व प्रमाणपत्र असे या पुरस्काराचे स्वरुप आहे.

उपप्राचार्य डॉ शामराव घाडगे, डॉ. लालासाहेब काशीद, आयक्यूएसी समन्वयक निलिमा पेंढारकर, प्रा.निलीमादेवी, डॉ. जयश्री बागवडे डॉ. संजय खिलारे, नितीन सावंत आणि समितीतील इतर सर्व सदस्यांनी घेतलेल्या परिश्रमामुळे हा पुरस्कार मिळाल्याचे डॉ. भरत शिंदे यांनी सांगितले. दरम्यान, यापूर्वीही महाविद्यालयाला विविध पुरस्कार मिळाले असून नुकतेच राष्ट्रीय स्तरावर देण्यात येणाऱ्या तारांकीत महाविद्यालयासाठीही विज्ञान व तंत्रज्ञान विभागाकडून तारांकीत महाविद्यालयाचे मानांकन मिळाले आहे.


ह्याचा प्रसार करा
Exit mobile version