Site icon Aapli Baramati News

श्रीगोंद्यापासून मासाळवाडीपर्यंत प्रेरणा सायकलवारी काढत रेश्माचं कौतुक; सायकल वारीमुळे पंखांना बळ मिळालं : रेश्मा पुणेकर

ह्याचा प्रसार करा

सुपे : प्रतिनिधी   

पुढील वर्षी कॅनडा येथे होणाऱ्या जागतीक बेसबॉल स्पर्धेत भारतीय संघाच्या नेतृत्वाची जबाबदारी माझ्यावर आहे. श्रीगोंदेकरांच्या अग्नीपंख फौंडेशनने सायकल वारी काढून माझ्या पंखांना आणखीन बळ दिले, असे मत भारतीय बेसबॉल संघाची कर्णधार रेश्मा पुणेकर हिने व्यक्त केले.

भारतरत्न डॉ.ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या प्रेरणेने काम करीत असलेल्या श्रीगोंदा येथील अग्नीपंख फौंडेशनने श्रीगोंदा ते मासाळवाडी (ता. बारामती) या ७० कि.मी. ची प्रेरणा सायकल वारी काढून मेंढपाळ कन्या आणि भारतीय बेसबॉल संघाची कर्णधार रेश्मा पुणेकर यांच्या जिद्द आणि नेत्रदिपक कामगिरीला सलाम केला. यावेळी मासाळवाडी (ता. बारामती) येथे बारामतीचे उपविभागीय पोलिस अधिकारी गणेश इंगळे, आदर्श उद्योजक राम कुतवळ, वृध्देश्वर मल्टीस्टेटचे अध्यक्ष विठ्ठलराव वाडगे यांच्या हस्ते रेश्मा पुणेकर हिचा धनादेश आणि डॉ. ए. पी. जे.  अब्दुल कलाम बेस्ट खेळाडू सन्मान बहाल करुन गौरव करण्यात आला.

यावेळी बोलताना गणेश इंगळे म्हणाले, अग्नीपंख फौंडेशनने प्रेरणा सायकल वारी काढून यशाचे शिखर गाठणारे खेळाडू, उद्योजक, समाजसेवक आणि  शेतकरी यांचा सन्मान केला, ही बाब कौतुकास्पद आणि आदर्शवत आहे. रेश्मा पुणेकर हिला सलाम करण्यासाठी श्रीगोंदेकरांनी काढलेली सायकल वारी तिला जागतिक बेसबॉल स्पर्धेसाठी नक्कीच हिम्मत देणार आहे.

ग्रामीण भागातील मुलांमध्ये मोठी इच्छा शक्ती असते.  फक्त त्यांना प्रोत्साहन आणि मार्गदर्शन मिळाले तर ते यशाचे शिखर गाठु शकतात असे मत राम कुतवळ यांनी व्यक्त केले.  या कार्यक्रमाला माजी सरपंच नवनाथ जगदाळे, कवी हनुमंत चांदगुडे, सेवानिवृत्त पोलिस निरीक्षक राजेंद्र साळुंखे, लक्ष्मण साळवे, संतोष तांबे यांची भाषणे झाली.

या सायकल वारीत दत्ताजी जगताप, नवनाथ दरेकर, देविदास खेतमाळीस, गोपाळराव डांगे, मिठू लंके, ॲड. संपतराव इधाटे, डॉ अनिल शिंदे, सविता शिंदे, सुरेश  खामकर, शैलेंद्र सांगळे, अनंत शिंदे, संकेत गांजुरे, मच्छिंद्र लोखंडे, प्रशांत एरंडे, दत्तात्रय हिरवे, भाऊसाहेब वाघ, राजकिशोरी लांडगे, किसन वऱ्हाडे, विठ्ठल निंबाळकर, मनिषा काकडे आणि बाळासाहेब काकडे आदींनी सहभाग घेतला होता. प्रास्ताविक मिठू लंके यांनी केले. सुत्रसंचलन शरद मचाले यांनी केले. तर दत्ताजी जगताप यांनी आभार मानले.

रेश्माने हाटले चुलीवर बेसन

दरम्यान, रेश्मा पुणेकर ही बेसबॉल खेळात यशाच्या शिखरावर पोहचली आहे. मात्र तिचे पाय अजुनही जमीनीवर आहेत. तिने सायकल पटूंना घरी भोजन देण्यासाठी चुलीवर स्वत: बेसन हाटले आणि घरगुती पाहुणचार करुन श्रीगोंदेकरांची मने जिंकली.

 


ह्याचा प्रसार करा
Exit mobile version