Site icon Aapli Baramati News

शरद पवार यांच्यासह अजित पवार, धनंजय मुंडे आज इंदापूरमध्ये; हर्षवर्धन पाटील यांच्या खंद्या समर्थकांचा राष्ट्रवादीत प्रवेश..!

ह्याचा प्रसार करा

इंदापूर : प्रतिनिधी 

इंदापूर तालुक्यातील राजकारणात मागील काही दिवसांपासून प्रचंड उलथापालथ सुरू आहे. माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या खंद्या समर्थकांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसची वाट धरली आहे. या पक्ष प्रवेश सोहळ्यासाठी ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यासह उपमुख्यमंत्री अजित पवार, सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे, खासदार सुप्रिया सुळे आदी मान्यवर इंदापूरमध्ये येत आहेत. दिग्गज नेत्यांच्या या दौऱ्यामुळे सर्वांचेच लक्ष इंदापूरकडे लागले आहे. 

माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांचे कट्टर समर्थक माजी जिल्हा परिषद सदस्य श्रीमंत ढोले यांच्यासह इंदापूर पंचायत विद्यमान सभापती स्वाती शेंडे आणि युवक कार्यकर्ते दिपक जाधव यांचाही आज राष्ट्रवादीत प्रवेश होणार आहे. लाखेवाडी येथे होणाऱ्या कार्यक्रमासाठी स्वत: शरद पवार उपस्थित राहणार आहेत.याच कार्यक्रमात राष्ट्रवादीचे अनेक दिग्गज नेते उपस्थित राहणार आहेत. 

दुसरीकडे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या उपस्थितीत काही प्रवेश होणार आहेत. आगामी निवडणुकांमध्ये हर्षवर्धन पाटील हे राष्ट्रवादीसाठी डोकेदुखी ठरू शकतात. त्याच पार्श्वभूमीवर हर्षवर्धन पाटील यांच्या जवळच्या नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना पक्षात आणून भाजप आणि हर्षवर्धन पाटील यांचे मानसिक खच्चीकरण करण्याचे प्रयत्न सध्या राष्ट्रवादीकडून केले जात असल्याच्या चर्चा झडत आहेत. 


ह्याचा प्रसार करा
Exit mobile version