बारामती : प्रतिनिधी
सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीसाठी राष्ट्रवादीकडून सोमेश्वर विकास पॅनलच्या माध्यमातून उमेदवार उभे करण्यात आले आहेत. या पॅनलच्या प्रचाराचा शुभारंभ आज दुपारी ३ वाजता श्री क्षेत्र सोमेश्वर येथे होणार असल्याची माहिती राष्ट्रवादी कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष संभाजी होळकर यांनी दिली.
सोमेश्वर कारखान्याच्या निवडणुकीसाठी राष्ट्रवादीकडून सोमेश्वर पॅनलच्या माध्यमातून २१ जणांना उमेदवारी देण्यात आली. त्यापैकी ब वर्गातून संग्राम सोरटे यांची बिनविरोध निवड झाली आहे. उर्वरीत २० जागांसाठी ही निवडणूक होत आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखालील सोमेश्वर विकास पॅनलच्या प्रचाराचा आज शुभारंभ होत असल्याचे संभाजी होळकर यांनी सांगितले.
आज दुपारी ३ वाजता श्री क्षेत्र सोमेश्वर मंदिरात नारळ वाढवून प्रचाराचा शुभारंभ केला जाणार आहे. पदाधिकारी, सभासद आणि कार्यकर्त्यांनी या शुभारंभ कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहनही संभाजी होळकर यांनी केले आहे.