बारामती : प्रतिनिधी
सोमेश्वर सहकारी कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीत प्रचारासाठी कमी कालावधी उरला आहे. दरम्यान, या कमी कालावधीमध्ये सर्वांना मतदारांपर्यंत पोहोचावे लागणार आहे. तसेच, प्रचारासाठी सभा घेणार असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जाहीर केले आहे. यावेळी या निवडणुकीसाठी इच्छुक असलेल्या योग्य आणि सक्षम व्यक्तींना संधी देणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे.
सोमेश्वर कारखान्याच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सोमेश्वर पॅलेस येथे सभासद मेळावा पडला. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्या खास शैलीत उमेदवारी मागणाऱ्यांवर भाष्य केले. तरुण म्हणतात, माझी पहिलीच वेळ तर, वयस्कर म्हणतात माझी शेवटची वेळ आहे. त्यामुळे उमेदवार निवडणे अवघड असल्याचे सांगत अजित पवार यांनी सोमेश्वरच्या निवडणुकीत जुन्या नव्यांचा मेळ घालण्यात येईल. कोणीही कोणाला पाण्यात बघू नये. तसेच, निवडणुकीमध्ये उभे राहिलेल्या उमेदवारांना निवडून आणण्याचे काम एकत्रित होऊन करावे असेही सूचित केले.
सोमेश्वरच्या कार्यक्षेत्रात रणधुमाळी..!
सोमेश्वर कारखान्याच्या निवडणुकीमुळे बारामती, पुरंदर तालुक्यातील वातावरण चांगलेच तापले आहे. गेल्या वर्षभरापासून सोमेश्वर कारखान्याच्या निवडणुकीला मुदतवाढ मिळाली होती. मात्र, आता निवडणुका जवळ आल्यामुळे इच्छुक उमेदवारांकडून जोरदार तयारी सुरू आहे. सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला आव्हान देण्यासाठी विरोधकांनी चाचपणी सुरू केली आहे.