बारामती : प्रतिनिधी
बाबुर्डी गावात डेंग्यू, चिकणगुनिया या आजाराची अनेक नागरिकांना लक्षणे आढळून आली आहेत. डेंग्यू, चिकणगुनिया, झिका आजाराचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आरोग्य विभागाच्या वतीने नुकताच बाबुर्डी गावात सर्व्हे करण्यात आला.
मोरगाव आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. अनिल वाघमारे यांच्यासमवेत ७ आरोग्यसेवक, ७ आरोग्य सेविका, २ आरोग्य साहाय्यीका, १ आशा सेविका असे आरोग्य विभागाच्या १८ कर्मचाऱ्यांनी घरोघरी जाऊन नागरिकांना सूचना दिल्या. यावेळी सौम्य लक्षणे असलेल्या नागरिकांना प्रथमोपचार म्हणून मेडिसिन वाटप करण्यात आले. नागरिकांनी आठवड्यातुन एक दिवस कोरडा दिवस पाळावा, घराच्या आजूबाजूला पाणी साचून देऊ नये, पाण्याची टाकी स्वच्छ ठेवावी आदी सूचना वैद्यकीय अधिकाऱ्यांनी घरोघरी जाऊन दिल्या.
यावेळी सरपंच ज्ञानेश्वर पोमणे, उपसरपंच दिपाली जगताप, ग्रामपंचायत सदस्य दत्तात्रय ढोपरे, मनिषा बाचकर, मंगल लव्हे, रुपाली लडकत, अर्चना पोमणे, शारदा लडकत, नाना लडकत, लक्ष्मण पोमणे, राजकुमार लव्हे, तंटामुक्ती अध्यक्ष किरण जगताप, ग्रामसेवक मधुकर जगताप आदी उपस्थित होते.