आपली बारामती न्युज - बारामती व परिसरातील बातम्या देणार हक्काचे व्यासपीठ !
अर्थकारणपुणेबारामतीमहानगरेमहाराष्ट्रराजकारण

सकाळी तक्रार अन संध्याकाळी निपटारा : अजितदादांच्या जनता दरबारात मिळाला न्याय

अर्थकारण
ह्याचा प्रसार करा

बारामती : प्रतिनिधी

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे आपल्या कार्यकुशलतेमुळे प्रसिद्ध आहेत. समोर आलेले काम हातासरशी संपवून टाकण्याची अजितदादांची खासीयत. अजितदादांच्या याच पद्धतीमुळे फलटण तालुक्यातील सेवानिवृत्त शिक्षकांना न्याय मिळाला आहे. रविवारी सकाळी या शिक्षकांनी अजितदादांची भेट घेत जमिन खरेदीत झालेल्या फसवणूकीची बाब सांगितली. अजितदादांनी तात्काळ आदेश दिले अन संध्याकाळी या शिक्षकांना आपली जमीनही परत मिळाली.

फलटण तालुक्यातील ११ शिक्षकांनी निवृत्त झाल्यानंतर मिळालेल्या रक्कमेतून बारामती शहरातील खंडोबानगर येथे ६० गुंठे जागा विकत घेतली होती. चांगला भाव विकताना येत असल्याने त्यातील ४० गुंठे जागा शहरातील नामांकित ‘तीन एजंट’ च्या माध्यमातून विकली.  त्या तिघांनी कमिशन तर कमावले व त्याच बरोबर फलटण ग्रुपचा विश्वास संपादित केला.त्यामुळे फलटण शिक्षक ग्रुप त्या तिघांवर खुश होता.  आता राहिलेल्या वीस गुंठे विकणेची जबाबदारीसुद्धा त्या तिघांवर टाकली. त्यानुसार ही २० गुंठे जागा विकून त्यांनी केवळ १४ लाख रुपये या शिक्षकांना दिले.  राहिलेले १  कोटी २८ लाख ५० हजार उद्या देऊ, आज कायम खुश खरेदी (दस्त नोंदणी ) करून द्या असे विश्वासाने सांगितले.

पहिले व्यवहार उत्तम झाल्याने फलटण शिक्षक ग्रुपने  कायम खुश खरेदी करून दिले. परंतु काही तासातच त्या तिघांनी पलटी मारून आता राहिलेली रक्कम देत नसल्याचे सांगून काय करायचे ते करा , बारामती मध्ये आमचे कोण वाकडे करू शकणार नाही अशी भूमिका घेतली. फलटण शिक्षक ग्रुप ने विनंती केली, हात जोडले, कमिशन वाढून देण्याची तयारी दर्शवली, मध्यस्थ घातले, तरी ते तिघे रक्कम देईनात. हताश झालेले सर्व वयस्कर शिक्षक अगोदरच रक्तदाब, मधुमेह व विविध व्याधीने त्रस्त होते. त्यात या घटनेमुळे प्रचंड मानसिक धक्का बसल्याने यातील काही जणांना बारामतीमधील हॉस्पिटलमध्ये मध्ये दाखल करण्यात आले.

सोमवारी दस्त नोंदणी रीतसर होणार होती. त्यामुळे रविवारी सकाळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या जनता दरबारात यातील काही जणांनी व्यथा मांडून न्याय मिळावा अशी अपेक्षा व्यक्त केली. अजित पवार यांनी त्वरित अतिरिक्त पोलीस अधीक्षक मिलिंद मोहिते यांना या प्रकरणात दोन्ही बाजू व  सत्यता पाहून गुन्हेगार असतील त्यांना सदर रक्कम देऊन टाकण्यास सांगा अशी सूचना केली.

पोलीस अधीक्षक डॉ अभिनव देशमुख,अतिरिक्त पोलीस अधीक्षक मिलिंद मोहिते,उपविभागीय पोलीस अधिकारी नारायण शिरगावकर यांच्या  मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक नामदेव शिंदे ,फौजदार बाळासाहेब जाधव, हवालदार गोपाळ ओमासे, पोलीस शिपाई अंकुश दळवी, आबासो चौधर यांनी त्वरित तिघांना पोलीस स्टेशनला आणून चौकशी केली. परंतु त्यांच्याकडून प्रतिसाद मिळत नव्हता. शेवटी पोलीसी खाक्या दाखवल्यानंतर  फसवणूक केल्याची कबुली दिली. अखेर दस्त पलटून देण्याचे लिखित स्वरूपात मान्य केले व पुन्हा फसवणूक करणार नसल्याचे सुद्धा लिहून दिले.

अजितदादांच्या जनता दरबारात रविवारी सकाळी तक्रार दिल्यानंतर त्याच रात्री न्याय मिळाल्याने फलटणमधील त्या शिक्षकांनी अजितदादांचे आभार मानत समाधान व्यक्त केले. 


ह्याचा प्रसार करा
अर्थकारण

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Contact Us