नवी दिल्ली : वृत्तसंस्था
राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी छत्रपती शिवाजी महाराजबद्दल केलेल्या ट्विटचा दाखला देत केंद्रीय तपास यंत्रणेकडून होत असलेल्या कारवायांवर केंद्र सरकारला लक्ष्य केलं. महाराष्ट्रात केंद्रीय यंत्रणांचा ज्या पद्धतीने वापर होतोय. महिलांना त्रास दिला जातोय. ते पाहता शिवाजीमहाराजांनी कधीही महिलांना लक्ष्य केलं नाही, असे खडे बोल सुप्रिया सुळे यांनी सुनावले.
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी वाराणसीत काशी विश्वनाथ धाम कॉरिडॉरच्या उद्घाटनप्रसंगी छत्रपती शिवाजीमहाराजांचा उल्लेख केला होता. त्यांनी ट्विट करत छत्रपती शिवाजी महाराज आणि औरंगजेब यांच्या इतिहासाचा दाखला दिला होता. मोदी यांनी केलेल्या या ट्विटचा संदर्भ देत सुप्रिया सुळे यांनी संसदेत मत व्यक्त केले. छत्रपती शिवाजीमहाराज हे अन्यायाविरुद्ध लढले. मात्र त्यांनी कधीच आपल्या लढाईमध्ये महिला आणि कुटुंबियांना लक्ष्य केलं नाही, असे खडे बोल सुनावत त्यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला. पंतप्रधान एकीकडे छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाचा दाखला देतात आणि दुसरीकडे केंद्रीय तपास यंत्रणेच्या माध्यमातून कुटुंबांना लक्ष्य करत आहेत असेही सुप्रिया सुळे यांनी नमूद केले.
छत्रपती शिवाजी महाराज हे महिलांचे आणि मुलांचे रक्षण करत होते. आता मात्र महिलांना केंद्रीय तपास यंत्रणेच्या माध्यमातून लक्ष्य केले जात आहे असे सांगतानाच राष्ट्रवादीचे नेते माजी मंत्री एकनाथ खडसे यांच्या पत्नी आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या कुटुंबावर केंद्रीय तपास यंत्रणेकडून होत असलेल्या त्रासाचा उल्लेखही सुप्रिया सुळे यांनी केला आहे.