
बारामती : प्रतिनिधी
२२ कोटी रुपये खर्च करून बांधलेल्या भव्य आणि प्रशस्त बारामती पंचायत समितीच्या नूतन इमारतीचे लोकार्पण राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या हस्ते होणार आहे. हा लोकार्पण सोहळा उद्या ( दि.१९) शिवजयंतीच्या दिनी सायंकाळी पाच वाजता पार पडणार आहे, अशी माहिती जिल्हा परिषदेचे बांधकाम सभापती प्रमोद काकडे यांनी दिली.
पंचायत समिती नूतन इमारतीच्या लोकार्पण कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार असणार आहेत. गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, खासदार सुप्रिया सुळे, राज्यमंत्री दत्तात्रय भरणे, राज्यमंत्री अब्दुल सत्तार, आमदार रोहित पवार, जिल्हा परिषद अध्यक्षा निर्मला पानसरे, विभागीय आयुक्त सौरभ राव, जिल्हाधिकारी राजेश देशमुख आणि ग्रामविकास मुख्य सचिव राजेश कुमार यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.
हा कार्यक्रम भिगवण रस्त्यावरील नविन पंचायत समिती कार्यालय येथे पार पडणार आहे. उद्या सायंकाळी पाच वाजता कोरोनाचे सर्व नियम पाळून कार्यक्रमासाठी उपस्थित राहावे, असे आवाहन पंचायत समितीच्या सभापती नीता फरांदे, उपसभापती रोहित कोकरे आणि गटविकास अधिकारी अनिल बागल यांनी केले आहे.