
सुपे : प्रतिनिधी
सुपे परिसरात गेल्या एक महिन्यापासुन कमी दाबाने विद्युत पुरवठा होत असल्याने विद्युत रोहित्र ट्रान्सफार्मर व शेती पंप नादुरुस्त होऊन बिघाड होण्याचे प्रमाण वाढले होते. त्यामुळे हातातोंडाशी आलेली पिके जळून जाण्याची शक्यता निर्माण झाली होती.या पार्श्वभूमीवर स्थानिक शेतकऱ्यांनी आंदोलनाचा पवित्रा घेतला होता. मात्र महावितरणकडून ही समस्या सोडवण्यात आली आहे. त्यामुळे सुप्यातील हे आंदोलन स्थगित करण्यात आले आहे.
कमी दाबाने होणाऱ्या वीजपुरवठ्यामुळे शेतकरी हतबल झाले होते. या पार्श्वभूमीवर सोमेश्वर कारखान्याचे संचालक गणेश चांदगुडे आणि स्थानिक शेतकऱ्यांनी ऐन दिवाळीत लक्ष्मीपुजनाच्या दिवशी बोंबाबोंब आंदोलन करण्याचा पवित्रा घेतला होता.
शेतकऱ्यांच्या आंदोलनाच्या इशाऱ्यानंतर महावितरण कंपनीकडून वीज पुरवठ्यातील त्रूटी शोधून त्यात दुरुस्ती करण्यात आली. त्यामुळे सुपे परिसरातील वीज पुरवठा सुरळीत आणि पुरेशा दाबाने होवू लागला आहे. त्यामूळे स्थानिक शेतकऱ्यांचे नियोजित आंदोलन स्थगित करण्यात आले आहे.