आपली बारामती न्युज - बारामती व परिसरातील बातम्या देणार हक्काचे व्यासपीठ !
पुणेबारामतीमहानगरेमहाराष्ट्र

लहान मुलांसाठी स्वतंत्र कोविड वार्डची सुविधा उभारा : उपमुख्यमंत्री अजित पवार

पुणे
ह्याचा प्रसार करा

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासनाने समन्वयाने काम करावे; उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतला बारामती तालुक्यातील कोरोना परिस्थितीसह उपाययोजनांचा आढावा

बारामती : प्रतिनिधी 

बारामती तालुक्यात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासनाने सम्नवयाने काम करावे, संभाव्य तिसऱ्या लाटेचा विचार घेऊन लहान मुलांसाठी स्वतंत्र कोविड वार्ड सर्व सुविधेसह सुरू करावे. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना करण्याच्या सूचना उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांनी आज दिल्या.

बारामती येथील विद्या प्रतिष्ठानच्या सभागृहात कोविड -१९ विषाणू प्रादुर्भावाची परिस्थिती आणि उपाययोजनांचा आढावा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज घेतला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी बारामती नगरपरिषद नगराध्यक्षा पौर्णिमा तावरे, जिल्हा परिषद पुणे बांधकाम आणि आरोग्य सभापती प्रमोद काकडे, पंचायत समितीच्या सभापती निता फरांदे, उपनगराध्यक्ष अभिजीत जाधव, पंचायत समिती उपसभापती रोहित कोकरे, उपविभागीय अधिकारी दादासाहेब कांबळे, महावितरणचे मुख्य कार्यकारी अभियंता सुनिल पावडे, अपर पोलिस अधिक्षक मिलिंद मोहिते, उपविभागीय पोलीस अधिकारी नारायण शिरगावकर, तहसिलदार विजय पाटील, गटविकास अधिकारी राहूल काळभोर, नगरपालिकेचे मुख्याधिकारी किरणराज यादव, सार्वजनिक बांधकाम पूर्व विभाग कार्यकारी अभियंता मिलिंद बारभाई, सार्वजनिक बांधकाम विभाग उपअभियंता विश्वास ओव्हाळ, कार्यकारी अभियंता, पाटबंधारे विभाग पुणे धोडपकर, सिल्व्हर ज्युबली रूग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ. सदानंद काळे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. मनोज खोमणे, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. चंद्रकांत मस्के, ‘बिकेसी’ मुंबई कोविड सेंटरचे डीन डॉ. ढेरे, नवी मुंबईचे मायक्रोबायोलॉजिस्ट डॉ. संदीप पाचपुते, माजी जिल्हा परिषद आरोग्य आणि बांधकाम सभापती संभाजी होळकर, ज्येष्ठ नगरसेवक किरण गुजर, गट नेता सचिन सातव आदींसह विविध विभागाचे अधिकारी, प्रतिनिधी उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, बारामती तालुक्यामध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासनाने समन्वयाने काम करावे, संभाव्य तिसऱ्या लाटेचा विचार करुन लहान मुलांसाठी स्वतंत्र कोविड वार्ड सर्व सुविधेसह सुरू करावे. रुग्णालयात सर्व सुविधा असणे आवश्यक आहे. सध्या कोरोना रुग्णांचा आकडा कमी होताना दिसत आहे, ही बाब दिलासादायक आहे. तथापि मृत्यू दर नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्न करण्यात यावेत.

सध्या खरीप हंगामातील शेतीची कामे चालू आहेत. शेती संबंधित कामे निर्बंधाच्या कालावधीत अडता कामा नये याची दक्षता घ्यावी. प्रत्येक रुग्णालयांत ऑक्सीजन निर्मिती संच उभारण्यावर भर द्यावा, त्यासाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही. ऑक्सीजन निर्मिती संच नामवंत कंपन्याचे असणे आवश्यक आहे. रुग्णालयातील वेटीलेटर दुरुस्त करुन घ्यावेत.

म्युकरमायकोसिस रुग्णांसाठी इंजेक्सशनचे योग्य नियोजन करावे. त्यासाठी तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. बारामती तालुक्यात बेड उपलब्ध असल्यास गृहविलगीकरण बंद करण्यात यावेत. शक्य असल्यास पेशंटच्या इच्छेनुसार खासगी रुग्णालयात विलगीकरण करण्यात यावे. महिला शासकीय ग्रामीण रुग्णालय, बारामती येथे कॅन्टीन सुरू करण्यात यावे. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी नागरिकांनी सहकार्य करावे, शासकीय नियमांचे पालन करावे, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

यावेळी बीकेसी कोविड सेंटर, बांद्रा, मुंबईचे डॉ. ढेरे व नवी मुंबई येथील मायक्रोबायोलॉजिस्ट डॉ. संदीप पाचपुते यांनी तीस-या लाटेची तयारी व क्रिटीकल केअर मॅनेजमेंटची व्यवस्था कशी करावी याबाबत मार्गदर्शन केले.
यावेळी बारामती शहर पोलीस कार्यालयातील महासंचालक पदक विजेते पोलीस उपनिरीक्षक दिलीप सोनवणे हे 31 मे रोजी शासकीय सेवेतून सेवानिवृत्त होत आहेत. त्यांचा सत्कार उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते करण्यात आला.

उपविभागीय अधिकारी दादासाहेब कांबळे यांनी प्रशासनाच्यावतीने करण्यात येत असलेल्या उपाययोजनांची माहिती दिली. तालुक्यामधील शहर व ग्रामीण भागातील कोरोना नियंत्रणासाठी उपाययोजना तसेच संभाव्य संभाव्य तिसऱ्या लाटेचा मुकाबला करण्याची तयारी, ऑक्सिजन, म्युकरमायकोसिसच्या औषधांचा पुरवठा सुरळीत होण्यासाठी करण्यात येणाऱ्या उपाययोजनांबाबत माहिती दिली. बैठकीला विविध यंत्रणांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.

ऑक्सिजन निर्मिती संचाचे उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन
या आढावा बैठकीपूर्वी श्रायबर डायनॅमिक्स डेअरीज प्रा. लि. बारामती यांच्यातर्फे महिला शासकीय रुग्णालय बारामती यांना देण्यात आलेल्या ऑक्सिजन निर्मिती संचचे उपमुख्यमंत्री यांचे हस्ते उद्घाटन करण्यात आले. यावेळी कंपनीचे रिजनल ऑपरेशनल मॅनेजर जितेंद्र जाधव व बिजनेस सपोर्ट मॅनेजर मंजुषा चव्हाण, वैद्यकीय व प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते. तसेच पियाजो व्हेईकल प्रा. लि. बारामती यांच्याकडून 10 ऑक्सीजन कॉन्सेन्ट्रेटर बारामतीतील रुग्णालयास, जिल्हा परिषद शाळा पणदरे येथील शिक्षक जयवंत कांबळे यांच्याकडून 1 लाख रूपयांचा धानादेश देखील उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते संबंधीत विभागातील अधिकाऱ्यांना सूपूर्द करण्यात आला. 


ह्याचा प्रसार करा
पुणे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Contact Us