
बारामती : प्रतिनिधी
शेतकऱ्यांवर झालेल्या अमानुष अत्याचाराच्या निषेधार्थ आज बारामती शहरातील भिगवण चौकामध्ये महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन करत निषेध व्यक्त केला. यावेळी जय जवान जय किसान, नरेंद्र मोदी हाय हाय, योगी आदित्यनाथ हाय हाय अशा घोषणा देत कार्यकर्त्यांनी या घटनेचा निषेध केला.
लखिमपूर खेरी येथे शेतकरी बांधवावर झालेल्या अमानुष अत्याचाराच्या निषेधार्थ आज महाविकास आघाडी सरकारच्या वतीने महाराष्ट्र बंदचे आवाहन करण्यात आले आहे. या बंदला बारामतीत उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. बारामतीतील सर्वच बाजारपेठ आज बंद ठेवण्यात आली.
दरम्यान, आज सकाळी महाविकास आघाडीच्या वतीने भिगवण चौकामध्ये या घटनेचा निषेध करण्यात आला. राष्ट्रवादी, शिवसेना आणि कॉँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी एकत्र येत मोदी सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करत निषेध व्यक्त करण्यात आला. यावेळी महाविकास आघाडीतील तीनही पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.