बारामती : प्रतिनिधी
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या आयुष्यातील एक हजार पोर्णिमा पूर्ण होत असून ही पौर्णिमा कोजगिरीची आहे. पौर्णिमेचे औचित्य साधून बारामतीत राष्ट्रवादी काँग्रेसकडून शरद पवार यांच्या उत्तम आरोग्यासाठी व दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करण्यात येणार असल्याची माहिती बारामती राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष संभाजी होळकर व शहराध्यक्ष इम्तियाज शकीलकर यांनी दिली आहे.
शरद पवार यांचा दरवर्षी १२ डिसेंबर रोजी जन्मदिवस असतो. हा त्यांचा जन्म दिवस मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. मात्र यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसकडून कोजागिरी पौर्णिमेचे औचित्य साधून एक वेगळाच उपक्रम राबवण्यात येत आहे. शरद पवार या वर्षी ८१ व्या वर्षात पदार्पण करणार आहेत. या पार्श्वभूमीवर यावर्षीचे कोजागरी पौर्णिमा ही त्यांच्या जीवनातील एक हजारवी पौर्णिमा असणार आहे. याच पौर्णिमेचे औचित्य साधून राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून त्यांच्या उत्तम आरोग्यासाठी व दीर्घायुष्यासाठी प्रार्थना, नमाज पठाण, अभिषेक, होमहवन करण्यात येणार आहेत. त्यासोबतच विविध समाजोपयोगी उपक्रम राबवणार आहेत.
कार्यकर्त्यांकडून शरद पवार यांच्या जीवनातील एक हजाराव्या पौर्णिमेनिमित्त शहरातील लोकांना एक हजार वस्तू असलेल्या किटचे वाटप करण्यात येणार आहे. या किटमध्ये कपडे, पुस्तके, किराणा, यांसारखे जीवनावश्यक वस्तूंचा समावेश असणार आहे. असेही यावेळी सांगण्यात आले आहे. मोठ्या उत्साहाने हा उपक्रम राबवणार असल्याचेही आयोजकांनी सांगितले.