मुंबई : प्रतिनिधी
राज्यातील बहुतांश नगरपरिषद आणि नगरपंचायतींची मुदत नोव्हेंबर महिन्यात संपत आहे. या नगरपरिषद आणि नगरपंचायतींच्या निवडणुकीचा कच्चा प्रारूप आराखडा तयार करून तो निवडणूक आयोगाकडे सादर करण्याचे आदेश आज संबंधित जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. कोरोनाच्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर नगरपरिषद, नगरपंचायत निवडणुका लांबणीवर पडतील अशी शंका असतानाच निवडणूक आयोगाने दिलेल्या आदेशामुळे राज्यात निवडणूक रणधूमाळीला लवकरच सुरुवात होणार यावर शिक्कामोर्तब झाले आहे.
राज्यातील ज्या नगरपरिषद आणि नगरपंचायतीची मुदत संपत आहे, त्यांच्या निवडणुकीसाठी प्रभाग रचनेचा कच्चा प्रारूप आराखडा तयार करून तो निवडणूक आयोगाला सादर करण्याचे निर्देश आज संबंधित जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत.
नगरपरिषद, नगरपंचायतच्या मुख्याधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती गठीत करून वार्ड रचनेचा प्रारूप कच्चा आराखडा तयार करण्यात यावा. हा आराखडा तयार करीत असताना भौगोलिक बदल, नद्या, नाले नवीन रस्ते, पूल, इमारती इत्यादी विचारात घ्यावे नगरपरिषद नगरपंचायत अधिसूचनेद्वारे त्याचे क्षेत्र निश्चित करून नकाशे तयार करावेत. आराखडा तयार करण्याची कार्यवाही तात्काळ म्हणजे 23 ऑगस्ट रोजी सुरू करावी असे निवडणूक आयोगाकडून प्रसिद्धीपत्रकाद्वारे ही माहिती देण्यात आली आहे. निवडणूक आयोगाने काढलेल्या परिपत्रकात नमूद करण्यात आले आहे.
कच्चा आराखडा तयार केल्यानंतर तात्काळ तो आराखडा निवडणूक आयोगाला ई-मेल द्वारे कळविण्याच्या सूचना देण्यात आल्या असून तयार केलेला कच्चा आराखड्याबाबतची गोपनीयता पाळण्यात यावी. कोणत्याही राजकीय दबावाला बळी न पडता वरील मार्गदर्शक सूचना लक्षात घेऊन हा आराखडा तयार करावा असेही यात नमूद करण्यात आले आहे. आराखड्याबाबत काही चुका झाल्यास व संबंधित नागरिक न्यायालयामध्ये गेल्यास कच्चा आराखडा तयार करणाऱ्या अधिकाऱ्याला जबाबदार धरले जाईल. संबंधित अधिकाऱ्याला त्याचे उत्तर न्यायालयामध्ये द्यावे लागेल असेही या परिपत्रकात नमूद करण्यात आले आहे.