आपली बारामती न्युज - बारामती व परिसरातील बातम्या देणार हक्काचे व्यासपीठ !
पुणेबारामतीमहानगरेमहाराष्ट्रराजकारण

यालाच म्हणतात ‘अजितदादा’ स्टाईल; वाचा काय घडलं आज बारामतीत..!

पुणे
ह्याचा प्रसार करा

बारामती : प्रतिनिधी

मागील दोन वर्षांपासून कोरोना काळात नियमांचं पालन कसं करावं हे  उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दाखवून दिलंय. इतकंच काय तर नियमांचं पालन न करणारांना भरसभेत खडसावल्याचीही अनेक उदाहरणे आहेत. आज बारामतीत विविध कार्यक्रमांच्या निमित्ताने अजितदादांनी हजेरी लावली. मात्र गर्दी टाळण्यासाठी त्यांनी अनोखी ‘आयडिया’ लढवत शिस्तीचा धडा दिला.  

महाराष्ट्रात सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा वाढत असल्यामुळे शासनाने निर्बंध लागू केले आहेत. कोणत्याही कार्यक्रमाला ५० लोकांनाच हजर राहण्याची परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे अजितदादांनी आज बारामती दौऱ्यात गर्दी टाळण्यासाठी चांगलीच शक्कल लढवली. आज सकाळी ८ वाजता अजित पवार हे पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीसाठी मतदान करणार होते. त्यामुळे पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांनी बारामतीतील एमईएस हायस्कूल परिसरात चांगलीच गर्दी केली होती.

आज सकाळी ६ वाजल्यापासून अजितदादांनी विकासकामांची पाहणी सुरू केली. त्यामुळे ते अगदी वेळेत मतदानाला येतील असा अंदाज कार्यकर्त्यांना होता. त्यामुळे आल्यासरशी दादांना नमस्कार करून जायचं असा बहुतांश कार्यकर्त्यांचा मानस होता. मात्र अजितदादांनी कार्यकर्त्यांचा अंदाज चुकवत साडेदहा वाजता मतदान केंद्रावर हजेरी लावली. दरम्यानच्या काळात बऱ्यापैकी कार्यकर्त्यांची पांगापांग झाली होती. दादांनी मतदान केलं, माध्यमांशी संवाद साधला अन् गर्दी टाळण्यासाठी उशीरा आल्याचंही सांगून टाकलं. इतकंच नाही तर ५० लोकांपेक्षा जास्त लोक असतील तर मी कार्यक्रमालाच येणार नाही असंही जाहीर करून टाकलं.

मतदानानंतर ४ वाजता श्री चैतन्य मातृत्व योजना आणि बारामती आयसीयू हॉस्पिटलचं उद्घाटन, तर ५ वाजता हॉटेल विराटचं उद्घाटन असे नियोजित कार्यक्रम होते. अजितदादा कार्यक्रमाला येतील का आणि आलेच तर गर्दी पाहून काय म्हणतील अशा विवंचनेत दोन्ही कार्यक्रमाचे आयोजक होते. अशातच अजितदादांनी थेट ३ वाजता डॉ. आशीष जळक यांच्या बारामती आयसीयू हॉस्पिटलचं उद्घाटन केलं. थोडक्यात आणि काहीच लोकांच्या उपस्थितीत कार्यक्रम पूर्ण करत अजितदादांनी पुढचाही कार्यक्रम उरकला.

एकूणच काय तर अजितदादांनी आज आपल्या ‘स्टाईल’मध्ये कोरोनाच्या नियमांचं पालन करण्याबद्दलचा धडा बारामतीकरांसोबतच, आयोजकांना आणि अजितदादांची बातमी मिळवण्यासाठी धडपडणाऱ्या मीडियालाही शिकवला. त्यामुळंच दादांची ही हटके ‘स्टाईल’ आज बारामतीकरांच्या चर्चेचा विषय बनला होता.    


ह्याचा प्रसार करा
पुणे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Contact Us