
मोरगाव : प्रतिनिधी
अष्टविनायक तीर्थक्षेत्र मोरगाव ता . बारामती येथील शुक्रवार दि. १५ रोजी होणारा मयुरेश्वराचा विजयादशमी पालखी सोहळा कोरोनामुळे रद्द करण्याचा निर्णय आज झालेल्या बैठकीत ग्रामस्थांनी बहुमताने घेतला. या दिवशी केवळ धार्मिक कार्यक्रम संपन्न होणार आहेत. दसऱ्या निमित्ताने रावण दहन, फटाक्यांची आतषबाजी, भुईनळे उडविले जाणार नसून ग्रामस्थांनी व भावीकांनी मंदिर परीसरात गर्दी न करण्याचे आवाहन सरपंच निलेश केदारी यांनी केले आहे.
मोरगावचा विजया दशमी सोहळा राज्यातील प्रसिद्ध सोहळ्यापैकी एक मानला जातो. या सोहळ्याला राज्या-परराज्यासह परदेशी नागरीकही हजेरी लावतात. या सोहळ्याच्या निमित्ताने मयुरेश्वर मंदिर फरसावर आज ग्रामस्थांसह मानकरी, पुजारी आदींची बैठक संपन्न झाली. यामध्ये कोरोना या विषाणूजन्य आजाराचा वाढता फैलाव, खबरदारीचा उपाय म्हणून केवळ धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्याचा निर्णय घेण्यात आला.
दसऱ्यानिमित्त दरवर्षी घरोघरी भूईनळे उडवले जातात. स्वहस्ते गंधक, सोडा, कोळसा वापरून शोभेची दारु बनविली जाते. हे दारुकाम पालखीसमोर उडवले जाते. मात्र आज रोजी झालेल्या ग्रामस्थांच्या बैठकीत केवळ धार्मिक कार्यक्रम करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच विजयादशमीनिमित्त रावण दहनाचा कार्यक्रमही होणार नसून मंदिर व परीसरात गर्दी न करण्याचे आवाहन सरपंच नीलेश केदारी यांनी केले आहे.