
बारामती : प्रतिनिधी
बारामती शहरात ‘स्वच्छ सर्वेक्षण’ अभियानाची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यासाठी बारामती नगरपरिषदेने आक्रमक पवित्रा घेतला आहे. शहरात नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाईचा बडगा नगरपरिषदेने उचलला आहे. उघड्यावर कचरा टाकणे, उघड्यावर लघुशंका, शौचास जाणाऱ्यांवर बारामती नगरपरिषदेकडून दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे.
केंद्र सरकारकडून स्वच्छ सर्वेक्षण अभियान राबवण्यात येत आहे. मात्र ‘स्वच्छ, सुंदर बारामती’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बारामती शहराची या अभियानातील कामगिरी काहीशी खालावली आहे. या पार्श्वभूमीवर बारामती नगरपरिषदेने आक्रमक पवित्रा घेत या अभियानाची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्याचा निर्धार केला आहे. त्यामुळेच आता नियमांचे उल्लंघन केल्यास दंडात्मक कारवाई केली जाणार आहे.
बारामती शहरात उघड्यावर कचरा टाकणे, लघुशंका किंवा शौचास जाणाऱ्यांवर कारवाई केली जाणार आहे. तसेच शहरात प्लॅस्टिक बंदी असल्यामुळे प्लॅस्टिकचा वापर करणाऱ्या व्यापाऱ्यांवरही दंडात्मक कारवाईला सुरुवात करण्यात आली आहे. राजकारणाची पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बारामतीचा स्वच्छ सर्वेक्षण अभियानातही नावलौकिक वाढावा यासाठी नगरपरिषद प्रशासन कामाला लागले आहे.
शहरात स्वच्छ सर्वेक्षणसह माझी वसुंधरा अभियानही प्रभावीपणे राबवले जात आहे. नागरिकांना स्वच्छतेसह वृक्षारोपण आणि वृक्ष संवर्धनाची सवय लागावी या अनुषंगाने उपाययोजना राबवल्या जात आहेत. त्याचवेळी नियमांचे उल्लंघन केल्यास दंडात्मक कारवाईचाही बडगा उगारण्यात आला आहे. त्यामुळे बारामतीकरांनी नियम न पाळल्यास दंडात्मक कारवाईला सामोरे जावे लागणार आहे.