बारामती : प्रतिनिधी
पुणे जिल्ह्यासह राज्यभरात विस्तारलेल्या बारामती सहकारी बँकेच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. निवडणूक निर्णय अधिकारी मिलिंद टांकसाळे यांनी याबाबतची घोषणा केली असून १९ डिसेंबर रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे.
राज्यातील बहुतांश सहकारी संस्थांच्या निवडणुका कोरोनामुळे पुढे ढकलण्यात आल्या होत्या. मात्र आता कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होवू लागल्याने राज्यातील विविध संस्थांच्या निवडणुका जाहीर होवू लागल्या आहेत. त्यानुसार आज बारामती सहकारी बँकेच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे.
१५ नोव्हेंबर ते २२ नोव्हेंबर या कालावधीत उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत देण्यात आली आहे. तर २३ नोव्हेंबर रोजी उमेदवारी अर्जांची छाननी केली जाईल. दि. २४ नोव्हेंबर रोजी वैध उमेदवारांची यादी प्रकाशित केली जाणार असून २४ नोव्हेंबर ते ८ डिसेंबर या कालावधीत उमेदवारी अर्ज माघारी घेता येणार आहेत. दि. ९ डिसेंबर रोजी चिन्ह वाटप होणार आहे. तर १९ डिसेंबर रोजी मतदान आणि दि. २१ डिसेंबर रोजी मतमोजणी प्रक्रिया पार पडणार आहे.