पुणे : प्रतिनिधी
पुण्यातील सर्व दुकानं सोमवार ते शुक्रवार सकाळी ७ ते रात्री ८ पर्यंत सुरु राहणार तर हॉटेल्स रात्री १० पर्यंत सुरु ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पुण्यात शनिवारी आणि रविवारी सर्व सेवांना दुपारी चारपर्यंत सुरु ठेवण्यास परवानगी देण्यात आली असल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली.
राज्य शासनाने कोरोना काळातील निर्बंध शिथिल करत अनलॉकबाबतची नवी नियमावली सोमवारी जाहीर केली होती. राज्यभरातील जवळपास २५ जिल्ह्यांना दिलासा मिळणार होता. मात्र पुणे, साताऱ्यासह ११ जिल्ह्यांमध्ये निर्बंध कायम होते. या जिल्ह्यांत तिसऱ्या टप्प्यातील निर्बंध लागू होते. आज पुण्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीनंतर निर्बंध शिथिल करण्यात आले आहेत.
त्यानुसार पुण्यातील सर्व दुकाने सोमवार ते शुक्रवार या कालावधीत रात्री ८ पर्यंत सुरू राहतील. शनिवारी आणि रविवारी सर्व सेवा दुपारी ४ वाजेपर्यंत सुरू ठेवण्याची मुभा देण्यात आली आहे. मॉल्सदेखील सोमवार ते शुक्रवार रात्री आठ वाजेपर्यंत सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात आली असून लसीचे दोन्ही डोस घेतलेल्यांना प्रवेश दिला जाणार आहे. १३ तालुक्यात लेव्हल तीनची नियमावली सोमवारपासून लागू केली आहे. ग्रामीणचा दर ५.५ आहे. पण तिथे लेव्हल ४ ऐवजी ३ ठेवली आहे.
“सात टक्केच्या पुढे पॉझिटिव्ह दर गेला तर दिलेली मुभा थांबवली येईल. त्यामुळे पुणे, पिंपरी चिंवडकरांनी नियमांचे पालन केलेच पाहिजे. दुकानात विक्री करताना दुकानाचे मालक आणि सेल्समन मास्क वापरत नाही अशी तक्रार आहे. मुभा देत असताना कोरोनाचा प्रादुर्भाव वाढणार नाही याची खबरदारी घ्यावी असेही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट केले आहे.