बारामती : प्रतिनिधी
माळेगाव सहकारी साखर कारखान्यावर सत्ता कुणाचीही असली तरी चेअरमन मात्र ‘तावरे’च झालेत. मात्र आता पुढील वेळ तावरे वगळता अन्य कोणाला संधी देणार असून हा माझा शब्द आहे, असे सांगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी माळेगाव कारखान्याच्या अध्यक्षपदाबाबत नवीन व्यक्तीला संधी देण्याचे संकेत दिलेत.
शनिवारी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत सोमेश्वर कारखान्याच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सभासद शेतकऱ्यांच्या मेळावा पार पडला. पुरंदरचे आमदार संजय जगताप, माजी आमदार अशोक टेकवडे, बांधकाम सभापती प्रमोद काकडे, सोमेश्वर कारखान्याचे अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप, माळेगावचे अध्यक्ष बाळासाहेब तावरे, छत्रपतीचे अध्यक्ष प्रशांत काटे, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष संभाजी होळकर, शहाजीराव काकडे, राजवर्धन शिंदे आदी मान्यवरांसह विविध संस्थांचे पदाधिकारी आणि सभासद यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी माळेगाव कारखान्याच्या कामकाजाचा आढावा घेतला. विरोधकांच्या ताब्यात कारखाना असताना कारखान्याची वाताहत झाल्याचे नमूद करत आता परिस्थिती पूर्वपदावर आणण्यासाठी काही कठोर निर्णय घेण्याची गरज असल्याचे मत व्यक्त केले. त्याचवेळी त्यांनी कारखान्याच्या अध्यक्षपदावरही भाष्य केले.
माळेगाव कारखान्यावर कोणाचीही सत्ता असली तरी चेअरमन मात्र तावरेच झालेत. त्यात मग चंद्रराव तावरे, रंजन तावरे आणि आताच्या काळात बाळासाहेब तावरे हे चेअरमन झाले. मात्र आता तावरे सोडून अन्य लोकांना कारखान्याच्या चेअरमनपदाची संधी देणार हा माझा शब्द असल्याचे अजित पवार यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, अजितदादांनी दिलेल्या शब्दानंतर माळेगाव कारखान्याच्या कार्यक्षेत्रात ‘चेअरमन कोण होणार’ याबद्दल चर्चा रंगू लागल्या आहेत. त्यातच इच्छुकांसाठीही ही ‘गुड न्यूज’ ठरली आहे. आता भविष्यात अजितदादा कोणाला संधी देतात, याकडेच सर्वांचे लक्ष लागले आहे.