Site icon Aapli Baramati News

महावितरणच्या ७३ वीज कर्मचाऱ्यांचा स्वातंत्र्यदिनी पुरस्काराने गौरव

ह्याचा प्रसार करा

बारामती : प्रतिनिधी

महावितरणतर्फे दरवर्षी कामगार दिनी दिले जाणारे ‘गुणवंत तांत्रिक कर्मचारी पुरस्कार’ यावर्षी स्वातंत्र्य दिनी देऊन बारामती परिमंडलातील ७३ वीज कर्मचाऱ्यांना सन्मानित करण्यात आले आहे. कोरोना प्रतिबंधामुळे हा कार्यक्रम व्हीसीद्वारे ऑनलाईन घेण्यात आला.  

प्रत्येक उपविभागातून एका जनमित्राची तर विभागातून एका उपकेंद्र यंत्रचालकाची पुरस्कारासाठी निवड करण्यात येते. त्याप्रमाणे परिमंडलातील १३ उपकेंद्र यंत्रचालकांना व ६० जनमित्रांना हा पुरस्कार मान मिळाला. कोरोना प्रतिबंधामुळे मुख्य अभियंता सुनील पावडे यांनी व्हीसीद्वारे संबोधित करुन सर्वांना अमृतमहोत्सवी स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या. त्यानंतर प्रत्येक कर्मचाऱ्याला संबंधित कार्यकारी अभियंता यांच्या हस्ते प्रमाणपत्र, सन्मानचिन्ह देण्यात आले.  

स्वातंत्र्यदिनाच्या समारंभानंतर झालेल्या कार्यक्रमाला मुख्य अभियंता पावडे यांच्यासह कार्यकारी अभियंता (प्रशासन) महावीर शेंडगे, उपमुख्य औद्योगिक संबंध अधिकारी श्रीकृष्ण वायदंडे यांची उपस्थिती होती. तर प्रत्येक विभागातून संबंधित कार्यकारी अभियंत्यासह इतर अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.


ह्याचा प्रसार करा
Exit mobile version