Site icon Aapli Baramati News

‘महाराष्ट्र बंद’ला बारामतीकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद; अत्यावश्यक सेवा वगळता सर्व व्यवहार बंद

ह्याचा प्रसार करा

बारामती : प्रतिनिधी

उत्तर प्रदेशातील लखीमपूर येथे शेतकऱ्यांना वाहनाने चिरडून टाकण्याच्या घटनेच्या निषेधार्थ महाविकास आघाडीच्या वतीने  आज ‘महाराष्ट्र बंद’ची हाक देण्यात आली आहे.  याला प्रतिसाद देत आज संपूर्ण महाराष्ट्रात कडकडीत बंद पाळण्यात आला. बारामतीतील व्यापारी वर्गानेही ‘महाराष्ट्र बंद’ ला पाठिंबा देत आपले व्यवहार बंद ठेवले. अत्यावश्यक सेवा वगळता बारामतीतील सर्वच व्यवहार आज बंद ठेवण्यात आले.

लखीमपूरमध्ये शेतकरी शांततापुर्वक काळे झेंडे दाखवून आंदोलन करत होते. मात्र, केंद्रीय मंत्र्याच्या मुलाने शेतकऱ्यांच्या अंगावर गाडी घातल्यामुळे शेतकऱ्यांचा मृत्यू होऊन मोठा नरसंहार झाला. याविरोधात केंद्र सरकारने अद्याप कारवाई केली नाही. शेतकऱ्यांचा आवाज बंद करण्याचा प्रयत्न होत आहे. यामुळे महाविकास आघाडीकडून शेतकऱ्यांना पाठींबा देण्यासाठी आणि घटनेचा निषेध म्हणून आज बंद पुकारण्यात आला.

या बंदला महाविकास आघाडीतील  राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना आणि काँग्रेस तिन्ही पक्षांनी पाठिंबा दर्शवला आहे.

या बंदमध्ये महाविकास आघाडीतील तिन्हीही पक्ष पूर्ण ताकदीनिशी उतरले. अन्नदात्या शेतकऱ्यांच्या अंगावर गाडी घालून हत्या करण्यात आली, या मुद्द्यावर देशातील जनतेला जागे करण्यासाठी महाराष्ट्रात बंद पुकारण्यात आला आहे.

दरम्यान, या बंदला बारामतीत उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. बारामतीतील अत्यावश्यक सेवा वगळता सर्वच्या सर्व दुकाने कडकडीत बंद ठेवण्यात आली. तसेच बारामती बाजार समिती, गणेश भाजी मंडई येथेही बंद पाळण्यात आला. एकूणच बारामतीकरांनी आज बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद देत लखीमपूरच्या घटनेचा निषेध नोंदवला.


ह्याचा प्रसार करा
Exit mobile version