पुणे : प्रतिनिधी
महात्मा फुले यांनी मोठ्या अडचणींना सामोरे जात मुलींच्या शिक्षणाचे दरवाजे उघडे केले. मात्र आजही अनेक भागातील मुलींना शिक्षणापासून वंचित राहावे लागत आहे. त्यामुळे देशात मुलींच्या शिक्षणासाठी पहिली शाळा सुरू करणाऱ्या महात्मा ज्योतिबा फुले यांच्या मूळ खानवडी गावात मुलींच्या शिक्षणासाठी शाळा उभारली जाणार असल्याची माहिती खासदार सुप्रिया सुळे यांनी दिली.
पुण्यात माध्यमांशी बोलताना खासदार सुप्रिया सुळे यांनी ही माहिती दिली. खानवडीमध्ये महात्मा फुले यांचे स्मारकही उभारण्यात येणार आहे. त्याचसोबत पुणे, सातारा आणि खानवडी अशा तीन ठिकाणी मोठ्या शाळा बांधण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे त्यांनी सांगितले. राज्यातील ऐतिहासिक स्थळांचा विकास आणि डागडुजी व्हावी यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत चर्चा करून निधीच्या उपलब्धतेसाठी प्रयत्न केले जातील, असेही खासदार सुप्रिया सुळे यांनी सांगितले.
लखिमपुर हिंसाचाराच्या घटनेवर बोलताना त्यांनी केंद्र आणि उत्तरप्रदेश सरकारवर घणाघात केला. महिला आणि शेतकऱ्यांवर होणारा हल्ला राष्ट्रवादी काँग्रेस कधीच सहन करू शकत नाही. लखिमपुरमध्ये शेतकरी शांततेने आंदोलन करत होते. मात्र त्यांच्यावर उत्तर प्रदेश सरकारनेच हल्ला केल्याचा आरोपही त्यांनी केला. प्रियंका गांधी आणि भूपेंद्र बघेल यांच्या भूमिकेला पाठिंबा असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.