
बारामती : प्रतिनिधी
बारामती सहकारी बॅंकेच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज माघारी घेण्याची मुदत बुधवार दि.८ डिसेंबरपर्यंत आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीपुरस्कृत सहकार प्रगती पॅनलच्या उमेदवारांची यादी उद्या जाहिर करण्यात येईल, अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली.
बारामती सहकारी बँकेच्या पंचवार्षिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सहकार प्रगती पॅनलच्या कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. यावेळी नगराध्यक्षा पौर्णिमा तावरे, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष संभाजी होळकर, शहराध्यक्ष इम्तियाज शिकीलकर, बारामती बँकेचे उपाध्यक्ष अविनाश लगड, गटनेते सचिन सातव यांच्यासह पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
बारामती सहकारी बँकेच्या १५ जागांसाठी निवडणूक होत आहे. राष्ट्रवादीकडून अनेकांनी निवडणूक लढवण्यासाठी इच्छा दर्शवली आहे. आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बारामतीतील राष्ट्रवादी भवन येथे इच्छुकांच्या मुलाखती घेतल्या. त्यानंतर झालेल्या मेळाव्यात बोलताना अजित पवार यांनी उद्या उमेदवार यादी जाहीर करण्यासंदर्भात सूचना दिल्या.
अनेकांना आपल्याला संधी मिळावी असे वाटत असते. त्यानुसार सक्षम आणि बँकेला प्रगतीपथावर नेवू शकतील असे उमेदवार देणार असल्याचे अजित पवार यांनी यावेळी सांगितले. मंगळवारी सकाळी ही यादी जाहीर केली जाणार आहे. त्यामध्ये कोणाला संधी मिळते याकडेच आता इच्छुकांचे लक्ष लागले आहे.