बारामती : प्रतिनिधी
बारामती शहरामध्ये बेकायदेशीररित्या गुटखा विक्री केल्याप्रकरणी केशव सोनबा जाधव (वय ५५ वर्षे) व संजय केशव जाधव दोन्ही (रा: नेवसे रोड कैकाड गल्ली बारामती) या दोघांविरोधात बारामती शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, नेवसे रोड येथील कैकाड गल्ली या ठिकाणी केशव सोनबा जाधव व संजय केशव जाधव हे दोघे संगनमताने गुटखा विक्री करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार गुरुवारी पोलिसांनी छापा टाकला असता घराच्या पाठीमागे असलेल्या पत्र्याच्या शेडमध्ये बेकायदेशीरपणे गुटखा विक्री केली जात असल्याचे आढळून आले. या कारवाईत पोलीसांनी एकूण ५० हजार ६७४ रुपये किंमतीचा पान मसाला गुटख्याचा साठा जप्त केला आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक डॉ.अभिनव देशमुख, अप्पर पोलीस अधीक्षक मिलिंद मोहिते, उपविभागीय पोलिस अधिकारी गणेश इंगळे, पोलीस निरीक्षक सुनील महाडिक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक गणेश पाटील, युवराज घोडके, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक संजय जगदाळे, पोलीस हवालदार रामचंद्र शिंदे, अभिजीत कांबळे, पोलीस नाईक दशरथ कोळेकर, कल्याण खांडेकर, पोलीस शिपाई तुषार चव्हाण, कोठे, सचिन कोकणे, दशरथ इंगोले, मनोज पवार यांनी केली.