Site icon Aapli Baramati News

बारामतीत श्रवणयंत्रासाठी २५५ कर्णबधिर नागरिकांची तपासणी; आजही होणार तपासणी

ह्याचा प्रसार करा

बारामती : प्रतिनिधी

उपमुख्यमंत्री अजित पवार व खासदार सुप्रिया सुळे यांचे विशेष प्रयत्नांतून आणि पवार पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट, स्वरूप फाउंडेशन मुंबई, यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबई आणि ठाकरशी ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमाने कानाच्या श्रवणयंत्र मशीनसाठी मोजमाप पूर्व तपासणी शिबिराचे आयोजन राष्ट्रवादी काँग्रेस भवन कसबा-बारामती या ठिकाणी करण्यात आले होते.   

या शिबिराचे उदघाटन तालुकाध्यक्ष संभाजी होळकर यांनी केले. तर स्वागत शहराध्यक्ष इम्तियाज शिकीलकर यांनी केले.  उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे खाजगी सचिव हनुमंत पाटील यांनी सदिच्छा भेट दिली.    सोमवारी झालेल्या या शिबिरामध्ये एकूण २५५ कर्णबधिर ज्येष्ठ नागरिक व लहान मुलांची पूर्व मोजमाप तपासणी करण्यात आली.

आज मंगळवार दि. २४ ऑगस्ट रोजी राष्ट्रवादी काँग्रेस भवन कसबा बारामती याठिकाणी राहिलेल्या कर्णबधिर नागरिकांची तपासणी करण्यात येणार आहे. तरी कर्णबधिर नागरिकांनी  तपासणी शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष संभाजी होळकर यांनी केले आहे.

कानांची मोजमाप तपासणी स्वरुप फाऊंडेशनच्या तज्ञ डॉक्टरांनी केली. शारदानगर नर्सिंग स्कूलमधील विद्यार्थिनींचे यासाठी सहकार्य लाभले. यावेळी बारामती संजय गांधी निराधार योजना समितीचे अध्यक्ष धनवान वदक, बारामती तालुका सोशल मिडिया अध्यक्ष सुनिल बनसोडे, स्वीय सहायक नितीन सातव, यशस्विनी सामजिक अभियान सहसमन्वयिका दिपाली पवार, निलेश जगताप, नितीन काकडे आदी उपस्थित होते.


ह्याचा प्रसार करा
Exit mobile version