Site icon Aapli Baramati News

बारामतीत मुस्लिम बांधवांसाठी उभारला जाणार प्रशस्त शादीखाना; निविदा प्रक्रिया सुरू

ह्याचा प्रसार करा

बारामती : प्रतिनिधी

बारामती शहरात मुस्लिम बांधवांसाठी प्रशस्त शादीखाना उभारण्यात येणार आहे. ३ कोटी ४६ लाख रुपये खर्चाचे हे काम असून त्यासाठी निविदा प्रक्रियेला सुरुवात करण्यात आली आहे. लवकरच या कामाला सुरुवात होवून बारामतीच्या सौंदर्यात भर घालणारी अजून एक प्रशस्त इमारत उभी राहणार आहे. त्याचवेळी मुस्लिम  बांधवांच्या विविध कार्यक्रमांसाठी शहरात एक हक्काची वास्तु उपलब्ध होणार आहे.

मुस्लिम बांधवांनी विविध प्रश्नांसाठी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि खासदार सुप्रिया सुळे यांच्याकडे निवेदने दिली होती. सुरुवातीच्या काळामध्ये देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना दादांनीही तत्कालीन अल्पसंख्यांक मंत्री विनोद तावडे यांच्याकडे पाठपुरावा केला. मात्र नगरपरिषदेला या कामांसाठी भरीव निधी मिळाला नाही. मागील दोन वर्षांपूर्वी महाविकास आघाडी सरकार स्थापन झाले आणि अजित पवार उपमुख्यमंत्री झाले. त्यानंतर त्यांनी मुस्लिम बांधवांच्या विविध मागण्यांबाबत व्यक्तीगत लक्ष घालून निधी उपलब्ध करून दिला आहे.

मुस्लिम समाजासाठी सभागृह म्हणजेच शादीखान्यासाठी जागेचा प्रश्‍न निर्माण झाला होता. मात्र वक्फ बोर्डाच्या सदस्यांनी सहकार्य करून यासाठी जागा उपलब्ध करून दिली.  त्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अनेक आर्किटेक्टकडून शादीखाना इमारतीसाठी वेगवेगळ्या डिझाईन्स मागवल्या. बारामतीत शादीखाना हा महाराष्ट्रातच नव्हे, तर देशातील प्रमुख एक सुंदर शादीखाना ओळखला जावा, अशा सूचनाही त्यांना दिल्या.

सर्व सोपस्कार पार पडल्यानंतर तब्बल ३ कोटी ४६ लाख रुपये खर्चाच्या शादीखान्याची उभारणी होणार आहे. त्यासाठी बारामती नगरपरिषदेने निविदा प्रक्रिया सुरू केली आहे. लवकरच हे काम सुरू होणार असून शहराच्या वैभवात भर घालणारी प्रशस्त इमारत उपलब्ध होणार आहे.  


ह्याचा प्रसार करा
Exit mobile version