बारामती : प्रतिनिधी
शिवनगर विद्या प्रसारक मंडळाच्या एमबीए कॉलेजचे प्राध्यापक नीलकंठ ढोणे यांची जम्मू येथील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट या संस्थेत प्राध्यापक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. केंद्र सरकारच्या अखत्यारीत असलेल्या या संस्थेत आंतरराष्ट्रीय दर्जाच्या प्राध्यापकांची निवड केली जाते.
देशभरातून १२२ प्राध्यापकांना या संस्थेकडून निमंत्रित करण्यात आले होते. महाराष्ट्रातून प्रा. नीलकंठ ढोणे यांची निवड करण्यात आली आहे. शिवनगर विद्या प्रसारक मंडळाच्या एमबीए कॉलेजमध्ये प्राध्यापक म्हणून कार्यरत असलेले नीलकंठ ढोणे यांची नुकतीच सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या सहाय्यक कुलसचिवपदी निवड झाली आहे.
देशातील सर्वोच्च संस्था असलेल्या इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट या संस्थेत प्रा. नीलकंठ ढोणे यांची निवड झाल्यामुळे बारामतीच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे. अत्यंत कमी वयामध्ये गुणवत्तेच्या जोरावर त्यांनी मिळविलेले दैदिप्यमान यश अनेक तरुणांना आदर्शवत आहे. त्यांच्या या निवडीबद्दल विविध स्तरातून त्यांचे अभिनंदन होत आहे.