बारामती : प्रतिनिधी
चोरी करण्यासाठी चोरटे काय डोकं चालवतील याचा नेम राहिला नाही. बारामती तालुक्यातील वडगाव निंबाळकर येथे चक्क पोलिस असल्याचं सांगत एका ठकाने एका वृद्धाकडील तीन तोळ्यांची सोनसाखळी लांबवल्याची घटना आज दुपारी घडली. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
शासकीय सेवेतून निवृत्त झालेल्या सावता नामदेव हिरवे (वय ६६, रा. वडगाव निंबाळकर) यांनी याबाबत वडगाव निंबाळकर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. याबाबत मिळालेली माहिती अशी की, सावता हिरवे हे आज दुपारी वडगाव निंबाळकर-कोऱ्हाळे खुर्द रस्त्यावर थांबले होते. त्यावेळी खाकी रंगाची पॅन्ट आणि डोक्यावर टोपी परिधान केलेला व्यक्ती त्या ठिकाणी दुचाकीवरुन आला.
या व्यक्तीने स्वतः पोलिस असल्याचे सांगत सावता हिरवे यांना त्यांच्याकडील तीन तोळे वजनाची सोनसाखळी काढून ठेवण्यास सांगत ती हातचलाखीने लंपास केली. या प्रकारानंतर संबंधित व्यक्ती वडगावच्या दिशेने निघून गेली. वडगाव निंबाळकर पोलिसांनी या व्यक्तीची शोधाशोध केली. मात्र तोपर्यंत हा ठक पसार होण्यात यशस्वी झाला.
या प्रकरणी वडगाव निंबाळकर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या चोरीचा पोलिस कसून शोध घेत असल्याची माहिती सहाय्यक पोलिस निरीक्षक सोमनाथ लांडे यांनी दिली.