पुणे : प्रतिनिधी
पुणे जिल्ह्यातील एक कोटीपेक्षा अधिक नागरीकांना कोव्हिड लसीकरण करण्यात आले आहे. मागील काही काळात लसीकरण मोहिमेने वेग घेतला आहे. मात्र संभाव्य तिसरी लाट लक्षात घेऊन लसीकरण मोहीम आणखी प्रभावीपणे राबवावी अशा सूचना देतानाच नागरीकांनीही खबरदारी बाळगावी, असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले आहे.
पुणे जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात लसीकरण मोहीम हाती घेण्यात आली आहे. त्यामुळे आतापर्यंत जिल्ह्यातील एक कोटीपेक्षा अधिक नागरीकांना लस देण्यात यश आले आहे. आतापर्यंत तब्बल १ कोटी १४ हजार नागरीकांचे लसीकरण पूर्ण झाले आहे. त्यामध्ये ६९ लाख ३४ हजार २५० जणांना पहिला डोस देण्यात आला आहे. तर ३० लाख ८० हजार जणांचा दूसरा डोस पूर्ण झालेला आहे.
लसीकरण मोहीम प्रभावीपणे राबवण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार हे स्वत: लक्ष देत आहेत. त्याचबरोबर विविध उद्योग समूहाच्या माध्यमातूनही लसीकरण मोहीम राबवली जात आहे. जिल्ह्यात एक कोटीपेक्षा अधिक लसीकरण पूर्ण झाल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी समाधान व्यक्त केले आहे. अजित पवार यांनी याबाबत ट्विट करत समाधान व्यक्त केले आहे. मात्र लसीकरणाचा वेग आणखी वाढवण्याबरोबरच नागरीकांनीही दक्षता घेणे आवश्यक असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
अजित पवार आपल्या ट्विटमध्ये म्हणतात, ‘कोरोनाविरुद्धच्या लढाईत पुणे जिल्ह्यात कोरोना प्रतिबंधक लसीचे १ कोटीहून अधिक डोस नागरिकांना देण्यात आले आहेत, ही अतिशय समाधानाची बाब आहे. परंतु कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेचा धोका कायम असून लसीकरणाची मोहिम आणखी वेगानं राबवली पाहिजे. नागरिकांनीही खबरदारी बाळगावी, असं आवाहन आहे.’