
नाशिक : प्रतिनिधी
राजकीय जीवनात काम करताना वास्तवाशी धरून काही वक्तव्यं केली पाहिजेत. मात्र काहीजण मोठ्या लोकांची नावं घेऊन वक्तव्य करून प्रसिद्धी मिळवण्याचा खटाटोप करतात. जिथे जाईल तिथे गरळ ओकायची काहींना सवयच लागली आहे. बारामतीकरांनी ‘त्या’ व्यक्तीला अतिशय चांगलं ओळखलं अन त्याची त्याला जागा दाखवली अशा शब्दांत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांच्या व्यक्तव्याचा समाचार घेतला.
भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यावर खालच्या पातळीवर जाऊन टीका केली. आज नाशिकमध्ये झालेल्या आढावा बैठकीनंतर पत्रकारांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना याबाबत प्रश्न केला. त्यावर बोलताना ना. पवार म्हणाले, राजकीय जीवनात वास्तव स्थितीशी अनुरूप वक्तव्ये करायची असतात. मात्र काहीजणांना मोठ्या व्यक्तींची नावे घेऊन प्रसिद्धीझोतात येण्याची सवय लागली आहे.
वास्तवात बेताल वक्तव्य करणारे वंचित बहुजन आघाडीत असताना बिरोबाची शपथ देऊन भाजपला मतदान करू नका असं सांगत होते. त्यांच्या या कृतीचा व्हिडीओ संपूर्ण महाराष्ट्राने पाहिला आहे. त्यामुळे काही लोकांना जाईल तिथे गरळ ओकायची सवय लागली असल्याचा टोला अजितदादांनी लगावला. या व्यक्तीला बारामतीकरांनी वेळीच ओळखला आणि त्याचं डिपॉजिट जप्त करून त्याला परत पाठवण्याचं काम चोखपणे पार पाडलं, असेही ना. पवार यांनी यावेळी सांगितले.