डोर्लेवाडी : प्रतिनिधी
बारामती तालुक्यातील झारगडवाडी येथे आयोजित केलेल्या राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेत डोर्लेवाडी येथील सेवन स्टार क्रीडा मंडळ या संघाने प्रथम क्रमांक पटकाविला. या स्पर्धेसाठी जिल्ह्यासह राज्यभरातून एकूण ८० संघानी सहभाग घेतला होता.
कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर बारामतीच्या ग्रामीण भागात लाल मातीतल्या कबड्डीचा आवाज पुन्हा घुमू लागला आहे. बारामती तालुक्यातील झारगडवाडी येथील राणा प्रताप क्रीडा मंडळाच्या वतीने या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते.स्पर्धेचे उद्घाटन राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष संभाजी होळकर, अविनाश लगड, नारायण बनकर, गणपत बालवडकर, पंचायत समिती सदस्य राहुल झारगड यांच्या उपस्थितीत करण्यात आले.
या स्पर्धेमध्ये पुणे,सातारा,रायगड,मुंबई,बीड,नगर,सांगली ह्या जिल्ह्यातून ८० संघानी सहभाग नोंदविला होता. ५५ किलो वजनी गटात प्रथम क्रमांक राणा प्रताप क्रीडा प्रतिष्ठान झारगडवाडी, द्वितीय क्रमांक वीर मराठा कोल्हापूर, तृतीय क्रमांक जयहिंद मांडवे माळशिरस, चतुर्थ क्रमांक बाणेर पुणे यांनी मिळवला.
६० किलो वजनी गटात प्रथम क्रमांक सेव्हन स्टार क्रीडा मंडळ डोर्लेवाडी, द्वितीय क्रमांक सोमश्वर कबड्डी संघ सोनगाव, तृतीय क्रमांक राणा प्रताप कबड्डी संघ कळंब, चतुर्थ क्रमांक ईगल स्पोर्ट क्लब डोर्लेवाडी या संघाने मिळवला. विजेत्या संघांना सन्मानचिन्ह आणि रोख रक्कम असे बक्षीस ग्रामस्थ आणि पदाधिकारी यांच्या हस्ते देण्यात आले.