जेजुरी : प्रतिनिधी
गेल्या दिड वर्षांपासून कोरोना महामारीने संपूर्ण जगभरात थैमान घातले होते. त्यामुळे अनेक राज्यात कडक लॉकडाऊन करण्यात आला होता. या पार्श्वभूमीवर सिनेमागृह, बाजार पेठ आणि देवस्थानेही बंद ठेवण्यात आली होती. आता मात्र शासनाने मंदिरे खुली केली असून महाराष्ट्राचे कुलदैवत जेजुरीचे खंडोबा देवस्थानही आजपासून खुले झाले आहे.
राज्य शासनाने आजपासून मंदिरे खुली करण्यास परवानगी दिल्यानंतर जेजूरीतील खंडेरायांचे मंदिरही सुरू करण्यात आले. पुरंदरचे आमदार संजय जगताप यांनी देवाची पूजा करून देवाला कोरोनाचे संकट लवकरच दूर होऊदे अशी प्रार्थना केली. आज सकाळी अनेक भाविकांनी दर्शनासाठी प्रचंड गर्दी केली होती. परंतु सर्व भाविकांना सॅनिटयझर केल्यानंतरच गडावर प्रवेश देण्यात आला.
सर्व भाविकांनी गर्दी करु नये म्हणून सोशल डिस्टन्सिंगचे पालन करुन तसेच मास्क परिधान केल्याशिवाय मंदिर प्रवेश देण्यात आला नाही. सकाळी देवाची पूजा झाल्यानंतर देवीची मूर्ती अत्यंत थाटात सजवून गाजत वाजत घटस्थापना करण्यात आली.