बारामती : प्रतिनिधी
भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी महाविकास आघाडी सरकार जाणार असल्याचा दावा केला आहे. त्यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. चंद्रकांत पाटील हे फार मोठे व्यक्ती आहेत. माझ्यासारखा लहान कार्यकर्ता त्यावर काय बोलणार, असा खोचक टोला त्यांनी बारामतीत पत्रकारांशी बोलताना लगावला आहे.
पाच राज्यातील निवडणुका संपल्यानंतर महाविकास आघाडी सरकार पडेल, असा दावा चंद्रकांत पाटील यांनी केला आहे. राज्य सरकारमधील नेत्यांमध्ये मतभेद वाढताना दिसत आहेत असेही त्यांनी म्हटले होते. त्याबद्दल बोलताना अजित पवार यांनी चंद्रकांतदादा हे मोठे व्यक्ती आहेत, त्यावर मी लहान कार्यकर्ता काय बोलणार असा टोला लगावला आहे.
सध्या आगामी अर्थसंकल्पावर काम चालू आहे. गोरगरीब घटकांना न्याय देण्याचा आमचा प्रयत्न असेल असे सांगून अजित पवार यांनी मंत्र्यांचे निधीवरून गैरसमज झाले असले तर ते आम्ही चर्चेतून दूर करू. आगामी अर्थसंकल्पाबद्दल प्रत्येकाला मत व्यक्त करण्याचा अधिकार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
बजाज समुहाचे माजी अध्यक्ष राहुल बजाज यांच्या जाण्याने उद्योग क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. जरी ते उद्योग क्षेत्रात असले तरी त्यांना समाजातील इतर महत्त्वाच्या गोष्टींवर मत व्यक्त केले होते. त्यांच्याकडून बरंच काही शिकण्यासारखं आहे असेही त्यांनी यावेळी सांगितले.