बारामती : प्रतिनिधी
दरोडा, खुनाचा प्रयत्न, गंभीर दुखापत, अग्नीशस्त्र बाळगणे अशा प्रकारचे १२ गंभीर गुन्हे दाखल असलेल्या फरार आरोपींना अखेर माळेगाव पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. सुग्रीव भंडलकर व अक्षय चव्हाण (रा. खांडज ) अशी या सराईत आरोपींची नावे आहेत.
बारामती तालुका पोलीस ठाण्यात गंभीर दुखापत करुन चोरी केल्याचा गुन्हा दाखल झाला होता. तेव्हापासून आरोपी सुग्रीव भंडलकर व अक्षय चव्हाण हे दोघेही फार झाले होते. बारामती तालुक्यातील खांडज २२ फाटा येथे हे दोघे येणार असल्याची गुप्त माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल घुगे यांना मिळाली.
ही माहिती मिळताच सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल घुगे, पोलीस नाईक काळे, दत्तात्रय चांदणे, प्रशांत राऊत यांनी २२ फाटा खांडज येथे शिताफीने सापळा रचून आरोपीस ताब्यात घेतले आहे. यातील सुग्रीव भंडलकर याचे विरूद्ध दरोडा, खुनाचा प्रयत्न, गंभीर दुखापत, अग्नीशस्त्र बाळगणे वगैरे १२ गंभीर गुन्हे दाखल आहेत.
बारामती तालुका पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक महेश ढवाण यांच्या मार्गदर्शनाखाली माळेगाव चौकीचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल घुगे आणि त्यांच्या पथकाने केली.