Site icon Aapli Baramati News

खजूर शेतीतून मिळवले लाखोंचे उत्पन्न; माळेगाव खुर्दमधील युवा शेतकऱ्याचा प्रयोग

ह्याचा प्रसार करा

बारामती : प्रतिनिधी

बहुतांशी वाळवंटी प्रदेशात केल्या जाणाऱ्या खजूर शेतीचा नाविन्यपूर्ण  प्रयोग बारामती तालुक्यातील माळेगाव खुर्द येथील शेतकरी  प्रशांत प्रतापराव काटे यांनी यशस्वी करुन  शेतीतून लाखो रुपये कमवण्याचा मार्ग  या भागातील  शेतकऱ्यांना दाखवला आहे, त्यांची ही यशोगाथा..

माळेगाव खुर्द हे बारामती शहरापासून दहा किमीच्या अंतरावर वसलेले एक खेडेगाव आहे. नीरा डाव्या कालव्यामुळे या गावातील परिसर हिरवागार झाला आहे. येथील बहुतांशी शेतकरी  ऊस, फळलागवड आणि बागायती पीके घेतात.  प्रयोगशील शेतकरी असलेल्या काटे यांना वलसाड, गुजरात येथून खजूर लागवडीची माहिती मिळाली. त्यांनी या पिकासाठी आवश्यक वातावरण आणि होणाऱ्या खर्चाचा अभ्यास करून लागवडीनंतर खजूर शेतीस  खर्च कमी असल्याने पाऊणे दोन एकरात खजूराच्या रोपांची लागवड केली.  लागवडीकरीता त्यांना ६ लाख रुपये खर्च आला. एक रोप  ३  हजार ५०० रुपये प्रमाणे त्यांनी  गुजरात मधून ११३ रोपे २०१७ मध्ये  मागवली.

सध्या त्यांच्याकडे  ११३  झाडे असून ती आता पाच वर्षाची झाली आहेत. खजूराच्या शेतीत त्यांनी आंतरपीक म्हणून पेरु फळझाडाचीही लागवड केली आहे. या वर्षी जुलै/ऑगस्ट मध्ये पीकाची पहिली तोडणी झाली. त्यामधून त्यांना दीड टन उत्पादन मिळाले आणि सर्व  खर्च वजा जाता  दीड लाख रुपये नफा भेटला. जागेवरच खजूराला मागणी आली. नफा चांगला भेटत असल्याने ते आणखीण खजुराची  लागवड करण्याच्या तयारीत आहेत. बारामती तालुक्यातील हा पहिलाच प्रयोग आहे.

 प्रशांत काटे यांच्या मालकी हक्काची १० एकर बागायती क्षेत्र आहे. खजुर शेतीबरोबरच श्री. काटे डाळिंब, पेरु आणि चिकू या फळांची लागवड देखील करतात. त्यांच्या शेतीला एक प्रकारे अॅग्रो टुरीझमचे स्वरुप प्राप्त झालेले आहे. परिसरातील अनेक  शेतकऱ्यांनी त्यांचे मार्गदर्शन घेतले असून अनेक वरिष्ठ अधिकारी यांनी देखील त्यांच्या शेतीला भेट देऊन समाधान व्यक्त केले आहे.

जिल्हा कृषि अधीक्षक ज्ञानेश्वर बोटे, उप विभागीय कृषि अधिकारी वैभव तांबे, तालुका कृषि अधिकारी सुप्रिया बांदल, आत्माचे संचालक किसनराव मुळे, मंडल कृषि अधिकारी चंद्रकांत मासाळ आदींनी  त्यांच्या खजूर शेतीला भेटी देऊन त्यांना  मार्गदर्शन केले. तसेच कृषि विज्ञान केंद्र येथील रविंद्र कलाने यांचेही त्यांना वेळोवेळी मार्गदर्शन लाभले आहे. शेतकऱ्यांनी आता पारंपारिक शेतीत न राहता आधुनिक पद्धतीने शेती केल्यास ती फायद्याची ठरू शकते हेच काटे यांच्या खजूर शेतीच्या यशस्वी प्रयोगाने दाखवून दिले आहे.


ह्याचा प्रसार करा
Exit mobile version