
बारामती : प्रतिनिधी
भारतात सर्वात मानाच्या समजल्या जाणाऱ्या केरळ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवामध्ये यंदा मराठमोळा दिग्दर्शक शुभम घाडगेच्या ‘दौरा’ या चित्रपटाने बाजी मारली आहे. चांडाळ चौकडीच्या करामती आणि पिपाण्याच्या भरघोस यशानंतर या वेबसीरिजमधील कलाकारांचा नवी लघुपट आला आहे. यातील कलाकार बारामती तालुक्यातील कांबळेश्वर येथील आहेत.
सरकारी योजना कशा राबवल्या जातात याचे उत्तम उदाहरण म्हणजे ‘दौरा’ लघुपट होय. या लघुपटात सरकारी योजना आणि त्यावर राजकारणी आपली पोळी कशी भाजतात हे उत्तम प्रकारे दाखवण्यात आले. दिग्दर्शक शुभम घाडगे यांनी या चित्रपटाची उत्तम मांडणी केली आहे. गावरान फिल्म्स प्रोडक्शन निर्मित हा लघुपट आहे. १६ एप्रिलला हा लघुचित्रपट प्रदर्शित झाला.
या लघुपटाला युट्यूबवर २४ हजारांहून अधिक लाईक्स मिळाल्या असून तब्बल ११ लाख ८३ हजार व्ह्यूज आहेत. ‘चांडाळ चौकडीच्या करामती’ फेम भरत शिंदे, रामदास जगताप, सुभाष मदने यांच्यासह अभिनेत्री रेणुका कानडे यांचीही या लघुपटात भूमिका आहे.