इंदापूर : प्रतिनिधी
कोरोनाच्या काळात चोरीच्या घटना प्रचंड प्रमाणात वाढल्या असल्याचे पहायला मिळाले. घरफोडी, मंगळसूत्र चोरी यासह गंभीर चोरीच्या घटना या काळात घडत आहेत. मात्र इंदापूर तालुक्यात एक विचित्र चोरीची घटना समोर आली आहे. भिगवणजवळच्या पोंधवडी गावात चक्क तलावातून पाच लाख रुपयांचे मासे चोरीला गेल्याची तक्रार दाखल झाली आहे. याबाबत भिगवण पोलिस ठाण्यात चौघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, पोंधवडी येथील शेतकरी बापूराव पवार यांनी पंधरा महिन्यांपूर्वी आपल्या शेततळ्यात सायफर्निस आणि चिलापी जातीच्या माशांचे बीज सोडले होते. ठराविक मुदतीत या माशांची वाढ होत असते. त्यामुळे ते ७ जुलै रोजी तळ्यावर गेल्यानंतर त्यांना माशांची चोरी झाल्याचे लक्षात आले. शेजारीच असणाऱ्या लोकांनी हे मासे चोरून नेल्याचा बापूराव पवार यांना संशय आहे.
बापूराव पवार यांनी गावातीलच चौघांविरोधात याबाबत फिर्याद दिली आहे. त्यानुसार भिगवण पोलिसांनी चौघांवर गुन्हाही दाखल केला आहे. बापूराव पवार यांनी आपल्या तळ्यातील माशांच्या विक्रीबाबत व्यापाऱ्यांशी सौदाही केलेला होता. मात्र मासे काढण्यासाठी गेल्यानंतर तळ्यातील माशांची चोरी झाल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यानुसार त्यांनी याबाबत तक्रारही दाखल केली आहे.
कोरोना काळात विविध प्रकारच्या चोऱ्यांच्या घटना घडल्या आहेत. आता इंदापूर तालुक्यात चक्क मासेच चोरून नेल्याचा प्रकार समोर आला आहे. त्यामुळे आता या अजब चोरीचा तपास करण्याचे आव्हान भिगवण पोलिसांसमोर आहे.