आपली बारामती न्युज - बारामती व परिसरातील बातम्या देणार हक्काचे व्यासपीठ !
कृषि जगतपुणेबारामतीमहानगरे

‘एन्व्हॉर्यमेंटल फोरम ऑफ इंडिया’ बारामतीत लावणार एक लाख झाडे

कृषि जगत
ह्याचा प्रसार करा

बारामती : प्रतिनिधी 

एन्व्हॉर्यमेंटल फोरम ऑफ इंडियाच्या वतीने बारामती शहर व तालुक्यात एक लाख झाडे लावली जाणार आहेत. फोरमच्या अध्यक्षा सुनेत्रा पवार यांनी ही माहिती दिली.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या संकल्पनेतून तालुका व शहर हरित व सुंदर असावे, पर्यावरणाचा समतोल राखला जावा या उद्देशातून एन्व्हॉर्यमेंटल फोरम ऑफ इंडियाच्या वतीने एक लाख झाडे लावली जाणार आहेत. नुकतेच बारामतीतील भिगवण रस्त्यावर बारामती सहकारी बँकेनजिक सुनेत्रा पवार यांच्या हस्ते वृक्षारोपण करुन मिशन मिलियन ट्री या उपक्रमाचा प्रारंभ करण्यात आला. या प्रसंगी उपविभागीय अधिकारी दादासाहेब कांबळे, नगराध्यक्षा पौर्णिमा तावरे,  गटनेते सचिन सातव आदी उपस्थित होते.

केपजेमिनी व इंटरनॅशनल असोसिएशन फॉर ह्यूमन व्हॅल्यू या संस्थांनी या उपक्रमासाठी सहकार्य केले आहे. बारामती तालुक्यातील 98 ग्रामपंचायतींच्या कार्यक्षेत्रात तसेच बारामती नगरपालिकेचे जुने गावठाण व वाढीव हद्दीसह, वनविभाग, सामाजिक वनीकरण विभागाच्या जमिनीवरही या झाडांचे वृक्षारोपण केले जाणार आहे. सुनेत्रा पवार म्हणाल्या, या वृक्षारोपण कार्यक्रमासाठी बहुसंख्य ठिकाणी खड्डे घेण्याचे काम पूर्णत्वास गेले असून येत्या काही आठवड्यांमध्ये झाडे लावण्याचेही काम केले जाणार आहे. 

बारामती पंचक्रोशीमध्ये प्रथमच एकाच वेळेस इतक्या मोठ्या संख्येने वृक्षारोपणाचा महत्वाकांक्षी कार्यक्रम हाती घेतला असून या मध्ये बारामती शहर व  तालुक्यातील नागरिकांसह, सेवाभावी संस्था व संघटनांचेही सहकार्य एन्व्हॉर्यमेंटल फोरम ऑफ इंडियास आवश्यक असल्याचे त्या म्हणाल्या.  ही झाडे लावताना अजित पवार यांच्या सूचनेनुसार स्थानिक हवामानामध्ये चांगली वाढ होतील व ज्या झाडांवर पक्षी वास्तव्य करु शकतील अशीच झाडे वृक्षारोपणासाठी निवडली आहेत, असेही त्यांनी नमूद केले.

या झाडांचा असेल समावेश…

या वृक्षारोपणादरम्यान पिंपळ, करंज, वड, काशिद, अर्जुन, ताम्हण, कांचन, शिसम, सीताफळ, जांभूळ, चिंच, आंबा आदी झाडे लावली जातील. 98 ग्रामपंचायतींच्या हद्दीत जवळपास 47 हजार झाडे लावण्याचे नियोजन करण्यात आले आहे. सामाजिक वनीकरण विभागासह वनविभागाच्या हद्दीतही 45 हजार झाडे तर बारामती नगरपालिकेच्या हद्दीत आठ हजार झाडे लावण्याचे नियोजन झालेले आहे.


ह्याचा प्रसार करा
कृषि जगत

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Contact Us