पुणे : प्रतिनिधी
जाधवर ग्रूप ऑफ इन्स्टिट्यूट संचालित डॉ. सुधाकरराव जाधवर सोशल अँड एज्युकेशन ट्रस्टच्या वतीने देण्यात येणारा आदर्श माता पुरस्कार यंदा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मातोश्री आशाताई अनंतराव पवार यांना पुरस्कार जाहीर झाला आहे. इन्स्टिट्यूटचे उपाध्यक्ष अॅड. शार्दुल जाधवर यांनी ही माहिती दिली.
गेल्या तीन वर्षापासून जाधवर इन्स्टिट्यूटच्या वतीने हा पुरस्कार देण्यात येतो. संस्थेच्या खजिनदार सुरेखा जाधवर यांच्या वाढदिवसानिमित्त या पुरस्काराच्या सोहळ्याचे आयोजन करण्यात येते. परंतु कोरोनाचे संकट लक्षात घेता; यावर्षी हा पुरस्कार सोहळा ऑनलाइन पद्धतीने घेण्यात येणार आहे. या सोहळ्यासाठी विधान परिषदेचे उपाध्यक्षा डॉ. नीलमताई गोऱ्हे, व्याख्यात्या सुषमा अंधारे तसेच संस्थेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
यावेळी अॅड. शार्दुल जाधवर म्हणाले की, आशाताईंनी स्वतः शेतीतील सर्व कामे केलेली आहेत. त्यांनी महाराष्ट्राला अजित पवारांच्या रूपाने हिरा दिला आहे. अजित पवार यांच्या भव्य कार्यामागे आशाताईंनी प्रचंड प्रेरणा, योगदान व मोलाचे मार्गदर्शन लाभले आहे. त्यामुळे त्यांना संस्थेचा यंदाचा पुरस्कार प्रदान करून सन्मानित करण्यात येणार आहे.