आपली बारामती न्युज - बारामती व परिसरातील बातम्या देणार हक्काचे व्यासपीठ !
बारामतीमहाराष्ट्रमुंबईराजकारण

अजितदादांनी वाढदिवसाच्या पूर्वसंध्येला स्विकारल्या कार्यालयातील अधिकारी-कर्मचाऱ्यांकडून आपुलकीच्या शुभेच्छा

बारामती
ह्याचा प्रसार करा

मुंबई : प्रतिनिधी

उपमुख्यमंत्री अजित पवार यांना त्यांच्या वाढदिवसानिमित्त, उपमुख्यमंत्री कार्यालयातील अधिकारी कर्मचाऱ्यांनी आपुलकीच्या शुभेच्छा दिल्या. करड्या शिस्तीच्या अजितदादांनी  कार्यालयातील प्रत्येक अधिकारी-कर्मचाऱ्याला स्वतंत्रपणे वेळ देऊन शुभेच्छा स्वीकारल्या. प्रत्येक कर्मचाऱ्याला अजितदादांदासोबत वैयक्तिक फोटो काढण्याची संधीही यावेळी दादांनी दिली.

अजितदादांच्या कार्यालयात कामे तात्काळ मार्गी लागतात कारण तिथं टीमवर्क म्हणून काम केलं जातं. अधिकाऱ्यांपासून चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांपर्यंत प्रत्येकाच्या कामाला तिथं प्रतिष्ठा आहे. कार्यालयासाठी प्रत्येक जण आणि त्याचं काम महत्वाचं आहे याची प्रचिती अजितदादांच्या वागणुकीतून सातत्यानं येते. वाढदिवसाच्या पूर्वसंध्येला झालेल्या कार्यक्रमात अजितदादांनी आपल्या स्टाफशी केलेल्या प्रेमाच्या संवादातून, वागणुकीतून त्याची अनुभूती पून्हा एकदा आली….

शुभेच्छा आपुलकीच्या आपलेपणाच्या…
उपमुख्यमंत्री अजितदादा पवार… नुसतं नाव ऐकलं तरी करड्या शिस्तीच्या दादांची करारी छबी डोळ्यासमोर येते. कडक खर्जातला जरब बसविणारा आवाज कानात घुमतो. त्यांची तीक्ष्ण नजर अगदी थेट आर-पार गेल्याचा आभास होतो. मात्र या कडकशिस्तीच्या अजितदादांच्या ह्रदयातही आहे मायेचा, आपुलीचा झरा. या आपुलकीची, आपलेपणाची प्रचिती उपमुख्यमंत्री कार्यालयातल्या सर्व स्टाफने अनुभवली. निमित्त होतं, दादांना दिलेल्या वाढदिवसांच्या शुभेच्छांचं… अंतरीच्या जिव्हाळ्याचं… 

त्याचं झालं असं… २२ जुलै रोजी आहे, आदरणीय दादांचा वाढदिवस. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आदरणीय दादांनी वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय घेतला आहे. आपल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी कोणीही प्रत्यक्ष येऊ नये, पुष्पगुच्छ पाठवू नये, गर्दी जमवू नये, असं जाहीर आवाहनच त्यांनी केलं आहे. त्यामुळं त्यांच्या अनेक चाहत्यांची, कार्यकर्त्यांची निराशा झाली आहे. या पार्श्वभूमीवर काल (दि. २० जुलै) दिवसभराचं कार्यालयीन कामकाज संपताना मंत्रालयातल्या उपमुख्यमंत्री कार्यालयाच्या समिती सभागृहात आदरणीय दादांच्या सर्व बैठका, नियोजीत भेटी झाल्यावर कार्यालयातले कर्मचारी नेहमीपेक्षा जास्तच वेळ उगीचच रेंगाळत असल्याचं दादांच्या लक्षात आलं. 
काय आहे…? असं नेहमीच्या दादा स्टाईलमध्ये त्यांनी विचारलं. त्यावर कुणीतरी अगदी भीतभीतचं काही नाही, शुभेच्छा द्यायच्यात…असं धाडस करुन सांगितलं. त्याला सावरुन घेत तिथं उपस्थित असणाऱ्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी कार्यालयातल्या स्टाफला आपल्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा द्यायच्यात असं दादांना सांगितलं. त्यावर ठिक आहे, चला… असा प्रेमळ दमच त्यांनी भरला. 

मग सुरु झाला ह्रद्य सोहळा… आपुलकीचा आपलेपणाचा… कार्यालयातल्या प्रत्येक कर्मचाऱ्याकडून अगदी वैयक्तिक स्वरुपाच्या शुभेच्छांचा स्वीकार करत, आदरणीय दादांनी प्रत्येकासोबत फोटोसेशनही केलं. मात्र या सोहळ्याचं वैशिष्ट्य होतं, ते म्हणजे ‘समान नागरी कायदा’… (अगदी शब्दश: घेऊ नका…) उपमुख्यमंत्री कार्यालयातल्या अगदी चतुर्थश्रेणी, कंत्राटी  कर्मचाऱ्यांपासून ते अतिवरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत सर्वांना एकच न्याय, कोणी मोठा नाही-कोणी छोटा नाही. प्रत्येकानं अगदी रांगेत येऊनच (सोशल डिस्टन्सिंग पाळत) दादांना शुभेच्छा दिल्या, त्या त्यांनी तितक्याच आपलेपणाने स्वीकारल्याही.

कोणालाही विशेष सवलत नाही, की विशेष वागणुक नाही. त्यामुळं प्रत्येकाच्या चेहऱ्यावर आनंदाचं समाधानाचं भरतंच यानिमित्तानं पहायला मिळालं. इतर वेळी अगदी घड्याळाच्या काट्यावर चालणाऱ्या दादांनी या कार्यक्रमामुळे आपलं वेळेचं नियोजन बिघडणार नाही, याची पूर्ण काळजी घेतली होती.


ह्याचा प्रसार करा
बारामती

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Contact Us