बारामती : प्रतिनिधी
बारामती नगरपरिषद हद्दीतील दुकाने, हॉटेल, मॉल्स आदी आस्थापनामधील मालक, कर्मचारी, विक्रेते यांनी आरटीपीसीआर चाचणी करणे बंधनकारक करण्यात आले आहे. प्रत्येक पंधरा दिवसाला ही चाचणी करणे अनिवार्य करण्यात आले असून चाचणी न करणाऱ्या आस्थापना, दुकाने सात दिवसांसाठी सील करण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती बारामती नगरपरिषदेच्या उपमुख्याधिकारी पद्मश्री दाईंगडे यांनी दिली.
बारामतीत मागील काही महिन्यांमध्ये कोरोनाने अक्षरश: रौद्ररूप धारण केले होते. त्यामुळे प्रशासनाला कडक निर्बंध लागू करत कोरोना प्रादुर्भाव करण्यासाठी कसरत करावी लागली. मागील काही दिवसांत कोरोना रुग्णांची संख्या आटोक्यात येत आहे. त्यामुळे शहरातील दुकाने सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे. परंतु शहरातील वाढती गर्दी लक्षात घेता कोरोना पुन्हा वाढू नये यासाठी आता सर्व आस्थापनांमध्ये विक्रेते, मालक, कर्मचाऱ्यांना आरटीपीसीआर चाचणी करणे बंधनकारक करण्यात आले आहे.
बारामती बाजार समिती आवारातील रयत भवनामध्ये उपजिल्हा रुग्णालयाच्या माध्यमातून सकाळी १० ते दुपारी ४ या वेळेत या चाचण्या केल्या जाणार आहेत. चाचणी केलेली नसल्यास संबंधित दुकान सात दिवसांसाठी सील केले जाणार आहे. तसेच इतरही दंडात्मक कारवाईची तरतूद करण्यात आली आहे.