Site icon Aapli Baramati News

‘अपना भी टाईम आयेगा’ : आयकर छाप्यानंतर संजय राऊत यांचा भाजपला इशारा

ह्याचा प्रसार करा

मुंबई : प्रतिनिधी

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निकटवर्तीयांवर आयकर विभागाकडून टाकण्यात आलेल्या छापेमारीनंतर सत्ताधारी भाजप आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. शिवसेना नेते  खासदार संजय राऊत यांनी यावर आपली प्रतिक्रिया दिली आहे. आज हे सूडबुद्धीने वागत आहेत, त्यांनी लक्षात ठेवावं अपना भी टाईम आयेगा, असा सूचक इशारा त्यांनी भाजपला दिला आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निकटवर्तीयांवर आयकर विभागाने गुरुवारी छापे मारले. या पार्श्वभूमीवर पत्रकारांशी बोलताना खासदार राऊत यांनी भाजपला लक्ष्य केले. ही राजकीय छापेमारी आहे. ज्याप्रकारे महाराष्ट्रामध्ये सीबीआय, ईडी, आयकर विभागाची छापेमारी अन् धाडसत्र चालू आहे ते सुडाचे राजकारण आहे. यामध्ये आम्हीसुद्धा भरडलो आहोत. केंद्र सरकारचा किंवा भाजपचा अजित पवार यांच्यावर राग असू शकतो. मात्र ज्या प्रकारे त्यांच्या निकटवर्तीयांना टार्गेट केले जात आहे ही एखाद्या राजकीय कुटुंबावर दहशत निर्माण करणारी ही छापेमारी आहे, असेही राऊत यांनी यावेळी सांगितले.

जरंडेश्वर साखर कारखान्याचा  व्यवहार न्यायालयाच्या निर्णयाने झालेला आहे. हे सगळ्यांना माहिती आहे. असे अनेक व्यवहार आहेत जे कायदेशीर आहेत. मात्र महाविकास आघाडीतील नेत्यांना अशाप्रकारे त्रास द्यायचा, त्यांच्यावर दबाव आणायचा ही कूटनीती वापरली जात आहे. प्रत्येक गोष्टीची नोंद होत असते. हेही दिवस निघून जातील.  आज हे  सूडबुद्धीने वागत आहेत. त्यांनी लक्षात ठेवावं, एक दिवस दिल्लीत आमचेही दिवस येतील. अपना भी टाईम आयेगा असे म्हणत त्यांनी भाजपला इशारा दिला आहे.


ह्याचा प्रसार करा
Exit mobile version