बारामती जवळच्या कण्हेरी गावात १०३ हेकटरवर वनउद्यान साकारण्यात येणार असून त्याला लागूनच नियोजित संत तुकाराम महाराज पालखी महामार्गालगत ७०० मीटरवर शिवसृष्टीचा प्रकल्पसाकारण्यात येणार आहे.
बारामती : आगामी काळात छत्रपती शिवाजी महाराजांचा जाज्वल्य इतिहास भावी पिढीसमोर उभा असावा व त्यातून त्यांना प्रेरणा मिळावी, तसेच बारामतीला पर्यटनस्थळाचा दर्जा प्राप्त व्हावा आणि बारामतीच्या ऐतिहासिक वैभवात भर पडावी या उद्देशाने बारामतीत 25 एकर जागेवर शिवसृष्टीचा भव्य प्रकल्प साकारला जाणार आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा शिवसृष्टी हा महत्वाकांक्षी प्रकल्प असून वनउद्यान व शिवसृष्टी बारामतीत येणाऱ्या प्रत्येकाच्या दृष्टीने आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरणार आहे.
या शिवसृष्टीचे वैशिष्टय म्हणजे रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांची जशी राजसदर आहे, हुबेहूब तशीच राजसदर या शिवसृष्टीत तयार होणार आहे. शिवाजी महाराजांचा मेघडंबरीत सिंहासनाधिष्ठीत भव्य पूर्णाकृती पुतळा येथे उभारला जाणार असून तो अत्यंत सुंदर असेल. याच ठिकाणी महाराजांच्या राज्याभिषेकाचा लेझर शो आठवड्यातून पाच दिवस संध्याकाळी दाखविला जाणार आहे. हा लेझर शो या शिवसृष्टीचे सर्वात मोठे आकर्षण असेल. सर्वात शेवटी शिवाजी महाराजांची समाधी असून त्याचे दर्शन घेऊन लोक बाहेर पडतील. याच ठिकाणी रायगडावर बाजारपेठ भरायची, तिच हुबेहूब साकारली जाईल. या शिवाय मुघल दरबार असून आग्र्याहून महाराजांच्या सुटकेचा प्रसंग येथे साकारला जाईल.
सिंधुदुर्ग किल्ला ज्या पध्दतीने पाण्यात आहे, त्याच धर्तीवर चारही बाजूला पाणी करुन त्यात किल्ल्याची प्रतिकृती साकारली जाणार असून ती पाहायला जाताना बोटीतून पर्यटकांना तेथपर्यंत जावे लागेल. त्या नंतर सिंहगडाची प्रतिकृती साकारली जाणार असून तीन शक्तीपीठांचीही प्रतिकृती शिवसृष्टीत असेल. या ठिकाणी एक अँम्पीथिएटर देखील उभारली जाणार आहे.
संपूर्ण शिवसृष्टीभोवती किल्ल्याच्या धर्तीवरची तटबंदी व बुरुजांची रचना केली जाणार असून विशेष म्हणजे पर्यटकांना या तटबंदीवरुन पूर्ण पणे चालतही फिरता येऊ शकेल. शिवसृष्टी पाहून संपल्यानंतर स्वताः शिवाजी महाराज सर्वांशी संवाद साधून एक सामाजिक संदेश देतील, आणि तेथे या शिवसृष्टीची सफर संपेल. मुंबईचे प्रसिध्द रचनाकार नितीन कुलकर्णी यांनी शिवसृष्टीचे डिझाईन साकारले आहे.