Site icon Aapli Baramati News

हातगाड्यावर भाजी विक्री करणाऱ्यावर हल्ला; बारामती पोलिसांनी दाखवला खाक्या

ह्याचा प्रसार करा

बारामती : प्रतिनिधी

दारू पिण्यासाठी पैसे न दिल्याने एका भाजी विक्रेत्यावर जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना बारामती शहरातील कसबा परिसरात घडली आहे. या प्रकरणी बारामती शहर पोलिसांनी अनिकेत सुरेश शिंदे या विकृत युवकावर गुन्हा दाखल करत त्याला पोलिसी खाक्या दाखवला.

याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की,  फारुख इसाक तांबोळी (वय.५५ वर्ष, रा.लक्ष्मीनगर,कसबा) हे बारामती शहरातील कसबा परिसरात हातगाड्यावरुन भाजी विक्री करतात. कसब्यातील अनिकेत शिंदे याने दारू पिण्यासाठी तांबोळी यांना वीस रुपयांची मागणी केली. त्यावर तांबोळी यांनी पैसे देण्यास नकार दिला. त्यातून या विकृत युवकाने टेबलजवळील पाना तांबोळी यांच्या डोक्यात घालून तेथून पलायन केले.

जबर मार लागल्यामुळे फारुख तांबोळी हे बेशुद्ध झाले. त्यांना सुरुवातीला सिल्व्हर ज्युबिली शासकीय उपजिल्हा रुग्णालयात आणि नंतर एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलीस निरीक्षक सुनील महाडिक यांनी घटनास्थळी पाहणी करून फारूक तांबोळी यांची भेट घेतली. तांबोळी यांच्यावर सध्या पुण्यात उपचार सुरू आहेत.

दरम्यान, या घटनेनंतर  अनिकेत शिंदे याला शहर पोलिसांनी तात्काळ ताब्यात घेतले. याचदरम्यान त्याने पळून जाण्याचा प्रयत्न केला. त्याला पोलिसी खाक्या दाखवल्यानंतर त्याने या घटनेची कबुली दिली. अनिकेत शिंदे यांच्या विक्षिप्त वागण्याबद्दल लक्ष्मीनगर भागात अनेक लोकांच्या तक्रारी आहेत. या घटनेनंतर शहर पोलिसांनी अनिकेत शिंदे यांच्यावर खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल केला आहे.

सदर गुन्ह्याचा तपास पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख, अपर पोलीस अधीक्षक मिलिंद मोहिते, उपविभागीय पोलिस अधिकारी गणेश इंगळे, पोलीस निरीक्षक सुनील महाडिक यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रकाश वाघमारे हे करत आहेत.

मदतीचे आवाहन

या घटनेत जखमी झालेले फारूक तांबोळी यांची आर्थिक परिस्थिती हलाखीची आहे. भाजी विक्रीचा व्यवसाय करून ते कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवतात.  या घटनेत ते गंभीररित्या जखमी झाले असून त्यांच्यावर पुण्यात उपचार सुरू आहेत. आधीच कौटुंबिक स्थिती हलाखीची असताना या घटनेमुळे संबंधित कुटुंबियांवर मोठे संकट ओढावले आहे. त्यामुळे दानशूर नागरिकांनी तांबोळी कुटुंबीयांना मदतीचा हात द्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.


ह्याचा प्रसार करा
Exit mobile version