Site icon Aapli Baramati News

‘सोमेश्वर’ देणार २८६७ रुपये एफआरपी; १० डिसेंबरपर्यंत सभासदांच्या खात्यात होणार जमा

ह्याचा प्रसार करा

सोमेश्वरनगर : प्रतिनिधी

सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळाच्या शुक्रवारी झालेल्या बैठकीमध्ये उसाला एफआरपीनुसार प्रतिटन २८६७ रुपये देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. एफआरपीनुसार होणारा हा दर एकरकमी दिला जाणार असून १० डिसेंबरपर्यंत सभासदांच्या खात्यात जमा केली जाणार असल्याची माहिती कारखान्याचे अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप यांनी दिली. पुणे जिल्ह्यातील अग्रगण्य कारखान्यांमध्ये सोमेश्वर कारखान्याचा समावेश होतो. त्यामुळे आता जिल्ह्यातील इतर कारखान्यांकडून एफआरपीबाबत काय निर्णय होतो याकडेच ऊस उत्पादकांचे लक्ष लागले आहे.

 सोमेश्वर कारखान्याच्या संचालक मंडळाची बैठक शुक्रवारी पार पडली. कारखान्याचे अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप, उपाध्यक्ष आनंदकुमार होळकर, कार्यकारी संचालक राजेंद्र यादव यांच्यासह संचालक मंडळ यावेळी उपस्थित होते. या बैठकीत उसाला एकरकमी २८६७ रुपये प्रतिटन दर देण्याचा निर्णय घेण्यात आला.

सोमेश्वर कारखान्याचा गाळप हंगाम १५ ऑक्टोबर रोजी सुरु झाला होता. गाळप हंगाम सुरळीत सुरू होण्यासाठी कारखान्याला १  नोव्हेंबरपर्यंत वाट पाहावी लागली. आजपर्यंत कारखान्याने २ लाख ४९ हजार टन उसाचे गाळप केले आहे. तर २ लाख ६३ हजार साखर पोती उत्पादित केली आहेत. कारखान्याचा सरासरी १०.६३ टक्के इतका साखर उतारा आहे.

शुक्रवारी झालेल्या बैठकीत १५ नोव्हेंबरपर्यंत गाळप झालेल्या १ लाख ३८ हजार ६०० टन उसाला २८६७ रुपये प्रतिटननुसार दर देण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार तब्बल ३९ कोटी ७३ लाख रुपये १० डिसेंबरपर्यंत सभासदांच्या खात्यात जमा केली जाणार असल्याचे कारखान्याचे उपाध्यक्ष  आनंदकुमार होळकर यांनी सांगितले.  


ह्याचा प्रसार करा
Exit mobile version