बारामती : प्रतिनिधी
सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या निवडणूकीसाठी मंगळवारी मतदान झाले असून उद्या गुरुवारी मतमोजणी होणार आहे. या पार्श्वभूमीवर प्रशासनाने मतमोजणीची जय्यत तयारी केली आहे. सकाळी ८ वाजता मतमोजणीला सुरुवात होणार आहे, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे यांनी दिली.
सोमेश्वर कारखान्याच्या निवडणुकीसाठी तब्बल २० हजार ७२९ सभासदांनी मतदानाचा हक्क बजावला. गुरुवारी बारामती शहरातील कृष्णाई लॉन्समध्ये मतमोजणी होणार आहे. ४१ टेबलवर विविध गटांची मतमोजणी होणार आहे. या संपूर्ण प्रक्रियेसाठी २२० कर्मचारी नेमण्यात आले आहेत. साधारण दोन तासात दोन गट या प्रमाणे मोजणी होणार आहे. सुरुवातीला दोन प्राथमिक फेऱ्या झाल्यानंतर प्रत्यक्ष मतमोजणीला सुरुवात केली जाणार असल्याचेही कांबळे यांनी सांगितले.
दरम्यान, निवडणूक निर्णय अधिकारी दादासाहेब कांबळे यांनी आज मतमोजणी प्रक्रियेच्या तयारीची पाहणी केली. उपविभागीय पोलिस अधिकारी गणेश इंगळे यांनीही मतमोजणी केंद्रास भेट देऊन सुरक्षा व्यवस्थेबाबत सूचना केल्या. या परिसरात १०० पोलिस कर्मचारी तैनात केले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.
या निवडणुकीत २० जागांसाठी तब्बल ४६ उमेदवार रिंगणात होते. राष्ट्रवादीच्या सोमेश्वर विकास पॅनेल आणि भाजपच्या सोमेश्वर परिवर्तन पॅनेलमध्ये ही निवडणूक रंगल्याचे पाहायला मिळाले. आता सभासदांनी नेमक्या कोणत्या उमेदवारांना पसंती दिली, ते उद्या निकालानंतर स्पष्ट होणार आहे.