Site icon Aapli Baramati News

सुनेत्रा पवार यांचा मोरया गोसावी जीवनगौरव पुरस्काराने होणार सन्मान

ह्याचा प्रसार करा

पुणे : प्रतिनिधी  

श्रीमन् महासाधू मोरया गोसावी संजीवनी समाधी सोहळा चिंचवड येथे संपन्न होत आहे. या निमित्ताने या वर्षीचा श्रीमन् महासाधू मोरया गोसावी जीवनगौरव पुरस्कार बारामती हायटेक टेक्सटाईल पार्कच्या अध्यक्षा सुनेत्रा पवार यांना जाहीर करण्यात आला आहे. शुक्रवार दि. २४ डिसेंबर रोजी हा पुरस्कार प्रदान केला जाणार आहे.

मोरया गोसावी संजीवनी समाधी सोहळ्याचे  ४६० वे वर्ष आहे. त्यानिमित्त महापुजा, होम हवन, शिबीर, मनोरंजनपर कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. चिंचवड देवस्थान ट्रस्ट,  पिंपरी चिंचवड महानगरपालिका व ग्रामस्थांच्या वतीने हा सोहळा साजरा केला जातो. या सोहळ्यानिमित्त दरवर्षी  समाजातील असामान्य कामगिरी करणाऱ्या मान्यवरांना देवस्थानच्या वतीने जीवनगौरव पुरस्काराने  गौरविण्यात येते. चिंचवड देवस्थान ट्रस्टचे मुख्य विश्वस्त मंदार देव, विनोद पवार, विश्राम देव, आनंद तांबे, राजेंद्र उमाप यांच्या उपस्थितीत या सोहळ्याच्या आयोजनाबद्दल बैठक झाली. या बैठकीत सुनेत्रा पवार यांना जीवनगौरव पुरस्कार देण्याचा निर्णय घेण्यात आला.

सुन्नेत्रा पवार यांनी बारामती टेक्सटाईल पार्कच्या माध्यमातून हजारो महीलांना रोजगार उपलब्ध करुन देऊन  महीला सबलीकरणासाठी विशेष प्रयत्न केले आहेत. एन्व्हार्यमेंटल फोरमच्या माध्यमातून पाच लाखांपेक्षा अधिक वृक्ष लागवड व संवर्धनाचे कार्य केले आहे. उन्हाळ्याच्या दिवसात वन्यप्राण्यांची पाण्यासाठी होणारी भटकंती  थांबवण्यासाठी बारामती, दौंड, इंदापूर आदी तालुक्यातील राखीव वनक्षेत्र, अभयारण्यात पाणवठे तयार करून टॅंकरद्वारे पाणी पुरवठ्याचे विशेष कार्य केले आहे. १२ हजारपेक्षा अधीक गोरगरीब रुग्णांवर मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. तसेच शैक्षणिक, सामाजिक अशा विविध क्षेत्रात त्यांनी समाजाभिमुख काम त्यांनी केले आहे.  

समाधी दिनाच्या पूर्वसंध्येस शुक्रवार दि. २४ डिसेंबर रोजी यावर्षीचा श्रीमन् महासाधू मोरया गोसावी जीवनगौरव  पुरस्कार सुनेत्रा पवार यांना प्रदान केला जाणार आहे. शुक्रवारी सायंकाळी ६ ते ८  वेळेत हा कार्यक्रम संपन्न होणार आहे. या पुरस्कार वितरण कार्यक्रमासाठी विविध मान्यवर उपस्थित राहणार असल्याची माहीती विश्वस्त विनोद पवार यांनी दिली.


ह्याचा प्रसार करा
Exit mobile version